बेळगाव महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर हल्ल्याचा प्रयत्न  

मल्लिकार्जुन मुगळी
Thursday, 1 October 2020

आयुक्त के. एच. जगदीश यांच्याकडे लेखी तक्रार देण्याचा निर्णय मार्केट व अतिक्रमण निर्मूलन विभागाने घेतला आहे. 

बेळगाव - अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. बुधवारी (ता.30) सायंकाळी महापालिकेच्या सीबीटी कॉम्प्लेक्‍ससमोर ही घटना घडली आहे. कॉम्प्लेक्‍ससमोर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या एका विक्रेत्याने हा प्रकार केला आहे. यामुळे तेथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या व्यावसायीकाने थेट हातात चाकू घेवून हल्ल्याचा प्रयत्न केल्यामुळे महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन पथकही बिथरले. त्याने आधी पथकावर हल्ल्याचा प्रयत्न केला, त्यानंतर स्वतः कुटुंबियासह विष पिऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिला. तेथील तणावाची स्थिती पाहून महापालिकेच्या पथकाने माघार घेतली. यासंदर्भात आयुक्त के. एच. जगदीश यांच्याकडे लेखी तक्रार देण्याचा निर्णय मार्केट व अतिक्रमण निर्मूलन विभागाने घेतला आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, समीर नावाची एक व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून सीबीटी कॉम्प्लेक्‍सच्या प्रवेशद्वाराजवळ हातगाडी थांबवून ऑम्लेट पाव विक्रीचा व्यवसाय करीत आहे. महापालिकेचा परवाना तर नाहीच शिवाय पालिकेच्या जागेत अनधिकृतपणे त्याने व्यवसाय सुरू केला होता. यासंदर्भात मार्केट विभागाकडून त्याला वारंवार सूचना देण्यात आली होती. तेथील हातगाडी हटविण्याची सूचना दिली होती. बुधवारी सायंकाळी महापालिकेचे मार्केट निरीक्षक त्या ठिकाणी गेले असता त्यांनी पुन्हा समीरला तेथून गाडी हटविण्याची सूचना केली. यावेळी त्याने उद्धटपणे उत्तर दिले. त्यामुळे निरीक्षकांनी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला पाचारण केले. त्यावर मार्केट निरीक्षक व पथकातील कर्मचाऱ्यांना त्याने अर्वाच्च शिवीगाळ केली. शिवाय हातात चाकू घेवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शासकीय कामात अडथळा आणला, शिवाय थेट हल्ल्याचा प्रयत्न केल्यामुळे प्रकरण अंगलट येणार हे समीरच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांने कुटुंबियांसह विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे महापालिकेच्या पथकाला तेथून माघार घ्यावी लागली. 

गेले काही दिवस महापालिकेचे सीबीटी कॉम्प्लेक्‍स चर्चेत आहे. तेथील गाळेधारकांना महापालिकेने नोटीस दिली आहे, त्या गाळेधारकांवर कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे. त्यातच बुधवारी हा प्रकार घडला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर याआधीही हल्ला झाला आहे.

हे पण वाचा -  जगात भारी कोल्हापुरी ; मास्क नाही, प्रवेश नाही, ; मुंबईत झळकला कोल्हापूर पॅर्टन

 

लॉकडाऊन आधी लिंगराज कॉलेजच्या मागे पोलिस लाईनमध्ये मोकाट जनावरांच्या मालकांनी पथकावर हल्ला केला होता. मारूती गल्लीतही पथकावर हल्ला झाला होता. त्यानंतर संभाजी चौकात मोकाट जनावरे पकडताना हरकत घेवून वाद घालण्यात आला होता. केळकर बाग व अन्य एका ठिकाणी कारवाईवेळी दगडफेकीचा प्रकार घडला होता. आता तर थेट हातात चाकू घेवून हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक धास्तावले आहे. 

 संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempt to attack the encroachment elimination squad of Belgaum Municipal Corporation