पेटवून घेऊन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न | Miraj | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेटवून घेऊन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मिरज : पेटवून घेऊन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मिरज : शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणाने ठाण्यातच पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आज पहाटे साडेतीनला घडलेल्या या घटनेत संबंधित तरुण भाजून जखमी झाला; तर या तरुणास वाचविणारा पोलिस हवालदारही जखमी झाला आहे. सरफराज महंमदअली जमखंडीकर (वय २६) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे, तर राम हरी वाघमोडे असे जखमी हवालदाराचे नाव आहे. या प्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी : आज पहाटे दीडच्या सुमारास सरफराज जमखंडीकर हा पोलिस ठाण्यात आला. यासीन, अबुबकर आणि आयुब या तरुणांनी आपणास मारहाण केली आहे. त्यांना ताबडतोब अटक करा, अशी मागणी करीत त्याने पोलिस ठाण्यात दंगा घालण्यास सुरुवात केली. या वेळी पोलिसांनी त्याच्या या तक्रारीस अनुसरून त्याने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन तपास केला.

हेही वाचा: नाशिक : घंटागाडीचा ठेका उच्च न्यायालयात

परंतु, तेथे काहीच आढळले नाही. याची नोंद घेण्यासाठी पोलिस कर्मचारी ठाण्यात आल्यावर सरफराज याने पुन्हा पहाटे सव्वातीनच्या सुमारास आपली पत्नी आणि दोन मुलांबरोबर शहर पोलिस ठाण्यात येऊन याच तिघांनी आपला मोबाईल खराब केल्याचे सांगत पुन्हा कारवाईच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यात दंगा केला. या वेळी पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याने याच तिघा तरुणांनी आपणास मारहाण केल्याचे सांगून आपण त्यांच्या गाड्या पेटवून देणार असल्याचे सांगत पुन्हा पोलिस ठाण्याच्या आवारातच जोरदार दंगा करण्यास सुरुवात केली. या वेळी त्याच्याबरोबर असलेल्या पत्नीच्या हातातील पेट्रोलची बाटलीही पोलिसांना दाखवली आणि लगेचच पत्नीच्या हातातून ती हिसकावून घेतली.

पोलिसांनी ही बाटली काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण, या वेळी सरफराजने बाटलीतील पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले आणि काडीपेटीने लगेचच स्वतःला पेटवूनही घेतले. या वेळी ठाणे अंमलदार वाघमोडे आणि अन्य पोलिस कर्मचाऱ्यांशी सरफराजशी झटापटही झाली. यात सरफराजला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना ठाणे अंमलदार वाघमोडे यांच्याही हातास भाजल्याने ते जखमी झाले. पोलिसांनी तातडीने सरफराज जमखंडीकर याला सांगलीच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात सरफराज जमखंडीकर याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top