कारहुणवीनिमित्त होणाऱ्या शिकारीवर लक्ष 

परशुराम कोकणे
बुधवार, 27 जून 2018

सोलापूर : कारहुणवीनिमित्त वन्यजीवांची शिकार करणाऱ्यांवर टोळ्यांवर वन विभागाचे लक्ष आहे. वन्यजीवप्रेमींच्या मदतीने सोलापूर वन विभाग शहर आणि ग्रामीण भागात शिकारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सज्ज असल्याचे उप वनसंरक्षक संजय माळी यांनी सांगितले. 

सोलापूर : कारहुणवीनिमित्त वन्यजीवांची शिकार करणाऱ्यांवर टोळ्यांवर वन विभागाचे लक्ष आहे. वन्यजीवप्रेमींच्या मदतीने सोलापूर वन विभाग शहर आणि ग्रामीण भागात शिकारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सज्ज असल्याचे उप वनसंरक्षक संजय माळी यांनी सांगितले. 

वट पौर्णिमा आणि कारहुणवीच्या निमित्ताने दोन दिवस ससा, काळवीट, तितर यासह इतर वन्यजीवांची शिकार करून ठिकाणी सर्वजण जमतात. प्रथेप्रमाणे होणाऱ्या कारहुणवीच्या शिकारी केल्या जातात. या शिकारीच्या प्रथेवर प्रतिबंध यावा म्हणून वन्यजीवप्रेमींच्या मदतीने वन विभागाने पथक तयार केले आहेत. बुधवारी रात्री अनेक ठिकाणी गस्त मारण्यात आली. तसेच गुरुवारही शिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घालण्यात येणार असल्याचे उपवन संरक्षक माळी यांनी सांगितले. 

बुधवारी दुपारी सांगोला परिसरात सशाच्या शिकारीसाठी भटकणाऱ्या शिकाऱ्यांना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. गेल्या पंधरा दिवसात बार्शी, अकोलेकाटी, कोंडी, मंद्रूप यासह सात ते आठ ठिकाणी नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या मदतीने शिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. उपवन संरक्षक संजय माळी हे शिकारी रोखण्यासाठी दक्ष आहेत, पण खालचे अधिकारी आणि कर्मचारी अपेक्षित लक्ष देत नाहीत असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. 

शिकारीसाठी एलईडी लाइट 
शिकारीला गेल्यावर वन्यजीवांना पावलांचा आवाज येऊ नये म्हणून बॅटरीला मशिन जोडून वेगळा आवाज केला जात आहे. तसेच वन्यजीवांवर प्रखर प्रकाश टाकण्यासाठी मोठ्या एलईडीचा वापरही केला जात असल्याचे समोर आले आहे. 

इथे कळवा माहिती
शहर किंवा ग्रामीण भागात सातत्याने शिकारी होत असतील किंवा कारहुणवीच्या निमित्ताने शिकार करण्यासाठी टोळी फिरत असेल तर तत्काळ वन विभागाला कळवण्यात यावे. वन विभागाच्या 1926 या हेल्पलाइन किंवा सोलापूर वन विभाग कार्यालयाच्या 0217-2305984 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: attention on hunting for karhunvi