मधुरांगण सखींनी साकारल्या मोहक कलाकृती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

कोल्हापूर - नव्या काळात विविधांगी कलाकौशल्याला विशेष महत्त्व आले आहे. अशीच एखादी नवी कला महिलांनाही आत्मसात करता यावी, यासाठी ‘सकाळ मधुरांगण’तर्फे क्राफ्ट आर्टिस्ट दीप्ती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रंगीत पेपर क्विलिंग वर्कविषयी कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी विविधरंगी कागदाला सुबक आकार देत साकारलेल्या कागदी कलाकृती मोहक ठरल्या. ‘सकाळ’ कार्यालयात ही  कार्यशाळा झाली.

रंगीत पेपर क्विलिंगच्या साहाय्याने कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याविषयी जागृती व नावीन्यपूर्ण कलेची माहिती व्हावी, यासाठी ‘सकाळ मधुरांगण’तर्फे कार्यशाळा घेण्यात आली.  
दीप्ती कदम यांनी कात्री, पेन, पेन्सिल, दोरी, कटर अशा मोजक्‍या साधनांनिशी कागदाचे कटिंग करत त्याला वक्राकार घड्या घालत महिलांच्या आवडीचे दागिने बनवले. यातून अंगठीपासून कर्णफुलापर्यंतचे मोहक आकार प्रकटले. त्याला साजेसे रंगकामही करण्यात आले. कागदाला नक्षीकाम करणे, त्यासोबत कागदांच्या सुबक आकृतीतून शुभेच्छापत्रे तयार केली. यानंतर सहभागी महिलांनी कागदी वस्तू बनविल्या.

या वेळी रंगीबेरंगी कागदापासून बनविलेले दरवाजावरील तोरण, भिंतीवरील लावण्याच्या फ्रेम्स याचे छोटे प्रदर्शनही घडविले. तसेच नक्षीकामाची माहितीही दिली. या कार्यशाळेत महिलांसोबत लहान मुलांनीही सहभाग घेतला.  

क्विलिंगच्या कागदी कलाकुसरीच्या वस्तूंना मागणी असते. घरबसल्या गृहिणी व युवतींना कलाकुसरीच्या वस्तू बनविता येतात. त्यातून लघुउद्योग उभारला जाऊ शकतो, याविषयीची माहिती दीप्ती यांनी दिली. या कार्यशाळेमुळे वर्षाअखेरच्या दिवशी मधुरांगण महिलांना नवी कला शिकता आली. या विषयी महिलांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, ‘सकाळ मधुरांगण’तर्फे उद्या रविवारी (ता. १) होणारी ‘जोडी तुझी माझी’ ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. त्याची सुधारित तारीख, वेळ, ठिकाण लवकरच ‘सकाळ’मधून जाहीर करण्यात येईल.

Web Title: Attractive designs by Madhuranga Sakhi