
उपक्रमास प्रतिसाद : शांतिनिकेतनमध्ये लवकरच उद्घाटन होणार
माधवनगर (सांगली) : जिल्ह्याला जशी राजकारण आणि सामाजिक चळवळींची परंपरा आहे तशीच साहित्य चळवळीचीही समृध्द परंपरा आहे. या जिल्ह्यातील लेखक-कवी-साहित्यिकांनी राज्य आणि राज्याबाहेरही आपला नावलौकिक मिळवला आहे. जिल्ह्यातील अशा साऱ्या विचारधारांच्या, सर्व साहित्य प्रकारांमध्ये लिहिणाऱ्या लेखकांच्या पुस्तकांचे दालन शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे साकारत आहे. या उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या दालनाचे उद्घाटन होणार आहे.
याबाबत माहिती देताना नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील यांनी सांगितले की, सांगली जिल्ह्याला मोठी साहित्य परंपरा असली तरी नव्या पिढीला ती माहिती आहेच असे नाही. जिल्ह्यातील लेखकांनी लिहीलेली अनेक उत्तम पुस्तके, संदर्भ ग्रंथ, कादंबऱ्या, कथासंग्रह, आत्मचरित्रे, व्यक्तीचित्रे, काव्यसंग्रह, पर्यटन-कृषी-खेळ-कला याबाबतची पुस्तके वाचकांना अजूनही माहिती नाहीत. ती सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. शिवाय जिल्ह्यातील लेखक कवींची सुचीही उपलब्ध नाही. याचा विचार करुन जिल्ह्यातील साहित्यिकांच्या सहकार्याने त्यांच्या पुस्तकांसाठी शांतिनिकेतन लोकविद्यापीठ संचलित यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयामध्ये हक्काचे दालन निर्माण करण्यात येणार आहे.
हेही वाचा- कोल्हापुरात ख्रिस्ती बांधवांची प्रार्थना; कॅरोलसिंगिंग, फटाके यांना फाटा -
साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांचे पुणे आणि शेटफळे येथे स्मारक व्हावे यासाठी आयोजित साहित्य जागरच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व साहित्यिक एकत्र आले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेतून हे दालन उभे रहात असल्याचे महेश कराडकर, दयासागर बन्ने यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध विचारधारेतील लेखक, कवी, साहित्यिक, विचारवंत, तज्ञ, अभ्यासक, कार्यकर्ते यांची ग्रंथसंपदा आता एकाच दालनात उपलब्ध होईल, असे समाधानही त्यांनी व्यक्त केले. तसेच उर्वरीत लेखकांनी त्यांनी पुस्तके ग्रंथालयाकडे द्यावीत असे आवाहन केले.
काय असेल दालनात-
जिल्ह्यात जन्मलेले पण सध्या जिल्ह्याबाहेर असलेल्या लेखकांची पुस्तके, सांगली जिल्ह्याचा इतिहास, नामांकित व्यक्ती, घटना, प्रसंग, पर्यटन, व्यक्तिचित्रे याबाबत जिल्ह्याबाहेरील लेखकांनी लिहिलेली पुस्तके, जिल्ह्यातील विशेषांक, जिल्ह्यातील हयात नसलेल्या मान्यवर विचारवंत-अभ्यासक-लेखक-कवींची पुस्तके, लेखकांची सुची दालनात असेल.
संपादन- अर्चना बनगे