सांगलीत अनेक तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

सांगली - गेल्या दोन महिन्यांत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने निम्म्या जिल्ह्यावर टंचाईचे संकट आहे. जत, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, आटपाडी तालुक्‍यात आजमितीला सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

सांगली - गेल्या दोन महिन्यांत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने निम्म्या जिल्ह्यावर टंचाईचे संकट आहे. जत, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, आटपाडी तालुक्‍यात आजमितीला सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगाम धोक्‍यात असून, पाण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. अशावेळी कृष्णा नदीतून वाहून जाणारे पुराचे पाणी उचलून म्हैसाळ, टेंभू, ताकारी योजनेतून या तालुक्‍यातील तलाव भरून घेण्याची गरज पुन्हा समोर आली आहे. 

जिल्ह्याच्या एकूण पावसाची आकडेवारी आणि त्याची सरासरी काढली तर आजच्या तारखेला सरासरीच्या २५ टक्के पाऊस कमी झाला आहे. वास्तविक, शासनाचे पाऊस मोजण्याचे निकष बदलले आहेत. तालुका, मंडलनिहाय पाऊस मोजला जातो, त्यातही चिंताजनक स्थिती आहे.

५ ऑगस्टपर्यंतचा सरासरी पाऊस

 •  मिरज तालुका     १२७ टक्के
 •  जत तालुका      ६२.३ टक्के
 •  खानापूर तालुका     १०५ टक्के
 •  वाळवा तालुका      ८९ टक्के
 •  तासगाव तालुका      ५५ टक्के
 •  आटपाडी तालुका     ४ टक्के
 •  कवठेमहांकाळ तालुका     ९५ टक्के
 •  पलूस तालुका     ९५ टक्के 
 •  कडेगाव तालुका     १४३ टक्के
   

जत, आटपाडी हे रब्बीचे तालुके आहेत, मात्र तरी तेथील सरासरीच्या कमीच पावसाची नोंद झाली आहे. तासगाव तालुक्‍यात अवघा ५५ टक्के पाऊस झालाय, ही चिंता वाढवणारी बाब आहे. मिरजेतील पावसाचा आकडा १२७ असला तरी मंडलनिहाय पावसाची आकडेवारी हे पूर्व भागातील चित्र काळजी वाढवणारे आहे. ज्या भागात सिंचन योजनांचे पाणी पोचले होते, तेथे काही अंशी टंचाईच्या झळा नाहीत, अन्यत्र शेतकऱ्यांना घोर लागला आहे. 

माती ओलावा अहवाल लवकरच
टंचाई जाहीर करताना केवळ पावसाच्या सरासरी आकडेवारीवर निर्णय घेतला जाणार नाही. अनेकदा दोन दिवसांत धो धो पाऊस पडतो आणि महिनाभर उघडीप असते. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे मातीतील ओलावा किती आहे, हे काही विशेष अंतराने तपासून त्याचा अहवालही टंचाईबद्दलचे धोरण ठरविताना घेतला जाणार आहे. त्याचा अहवाल लवकरच हाती येईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

आमदार बाबर यांचा प्रस्ताव
आमदार अनिल बाबर यांनी विधिमंडळ अधिवेशनात टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योनजेतून पावसाळ्यात पाणी उचलावे, हे पाणी पुरातून वाहून  जात आहे, त्यातून दुष्काळी तालुक्‍यातील तलाव भरून घ्यावेत, अशी मागणी केली होती. टंचाईची स्थिती अशीच राहिली तर राज्य शासनाला त्याचा विचार करावा लागेल. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांच्याकडेही अशा मागण्या वाढू लागल्या आहेत. 
 

 

Web Title: average less rainfall in Jat, Tasgaon, Kavthemahankal, Palus, Aatpadi