बापरे ! मुलांच्या दप्तरात कोयता, फायटर

हेमंत पवार
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

कऱ्हाड-मलकापूरची गुंडगिरी संपायलाच तयार नाही. या गुंडांच्या "स्टाइल'चे अनुकरण आता शालेय विद्यार्थीही करू लागले आहेत.

कऱ्हाड : खेळण्या-बागडण्याच्या, चेष्टा-मस्करी करत शिकण्याच्या वयातच शालेय मुलांकडे कोयता, फायटर आणि बनावट पिस्तूल सापडू लागले आहेत. शहरातील गुंडांच्या टोळ्यांमधील वर्चस्ववादासारखे वर्तन शालेय विद्यार्थ्यांकडूनही होऊ लागल्याने ही तरुणाई कोणत्या थराला जावू लागली आहे, हे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी जागे होऊन आपल्या मुलांची संगत, वर्तन तपासून सजग होण्याची गरज आहे. 

कऱ्हाड शहराला गुंडगिरी नवीन नाही. मात्र, कऱ्हाड आणि गुंडगिरी हे झालेले समीकरण मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतलेला आहे. परंतु, कऱ्हाड-मलकापूरची गुंडगिरी संपायलाच तयार नाही. या गुंडांच्या "स्टाइल'चे अनुकरण आता शालेय विद्यार्थीही करू लागले आहेत.
 
शालेय अवस्थेतील लहान वय म्हणजे ते खेळण्या-बागडण्याचे, चेष्टा-मस्करी करत शिकण्याचे वय, ही आजपर्यंत रुढ संकल्पना होती. मात्र, ती आता त्या लहान वयातील विद्यार्थ्यांकडूनच बदलू लागल्याचे वास्तव कऱ्हाडमध्ये समोर आले आहे.

हा प्रकार पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारा

खेळण्याच्या वयातच खुन्नस धरून शालेय मुलांच्या दप्तरात वह्या-पुस्तके, कंपासऐवजी थेट कोयता, फायटर आणि बनावट पिस्तूल सापडू लागले आहे. एकाच क्‍लासला असलेल्या मुलांच्या चेष्टेतून झालेल्या वादातून संबंधित मित्रावर दबाव टाकण्यासाठी एका विद्यार्थ्याने केलेला हा प्रकार सर्वच पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.

शहरातील गुंड ज्याप्रमाणे वर्तन करतात, त्याप्रमाणे आता शालेय विद्यार्थ्यांतही हे लोण पोचू लागले आहे. त्याला वेळीच आवरण्यासाठी पालकांनीच आता जागरुक होण्याची गरज आहे. गुंडांच्या टोळ्यांतील वर्चस्ववादासारखे वर्तन शालेय विद्यार्थीही करू लागल्याने ही धोक्‍याचीच 
घंटा आहे. त्यामुळे आतातरी पालकांनी जागे होऊन आपल्या मुलांची संगत, वर्तन तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. 

पालकांनी दप्तर तपासावे 

सोशल मीडियातून येणाऱ्या व्हिडिओसारखे वर्तन करण्याचा प्रयत्न विद्यार्थी करतात. त्याचबरोबर त्यांना कुणाचे तरी अनुकरण करण्याची सवय असते. त्याच्यातूनच असे प्रकार घडत आहेत. असे वाईट प्रकार टाळण्यासाठी पालिकांनीच आता जागरुकपणे विद्यार्थ्यांचे दप्तर तपासण्याची गरज आहे. अधूनमधून त्यांच्या दप्तरात काय-काय आहे, याची तपासणी करून त्यात काही आढळल्यास त्या-त्या वेळी त्यांची कानउघडणी करण्याची गरज आहे. 

हा घडला हाेता प्रकार... 

वाद असलेल्या मुलाला धमकावण्यासाठी शाळेतील अल्पवयीन मुलांनी कोयता, फायटर आणि बनावट रिव्हॉल्व्हर दप्तरात बाळगल्याचा प्रकार पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्या पथकाने नुकताच उघडकीस आणला. या प्रकारात मुलांना समज देत त्यांच्या पालकांची पाेलीसांनी चांगलीच कानउघडणी केली. 

शहर परिसरातील एका खासगी क्‍लासमध्ये जाणाऱ्या चार मुलांची एका मुलाशी वादावादी होत होती. हा वाद वाढत गेल्यावर चार मुलांनी त्या मुलास धमकावण्यासाठी कोयता, फायटर आणि बनावट रिव्हॉल्व्हर गोळा केले. ते दप्तरात लपवून क्‍लासमध्ये आले होते.

पाेलिसांची सतर्कता

ज्या मुलाशी भांडणे झाली आहेत त्याला घाबरवण्यासाठी त्यांनी ती हत्यारे जवळ ठेवली होती. दरम्यान या प्रकाराची माहिती पोलिस उपअधीक्षक गुरव यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलिस उपनिरीक्षक एस. डी. शेलार, कर्मचारी सौरभ कांबळे, प्रवीण पवार, सागर बर्गे, चंद्रहार पाटील यांना पाठवून त्याची खातरजमा करण्यास सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी त्या मुलांवर गोपनीय पद्धतीने पाळत ठेवून त्यांची दप्तरे तपासली. त्यामध्ये कोयता, फायटर व बनावट रिव्हॉल्व्हर सापडले. संबंधित मुलांसह त्यांची ज्या मुलाशी भांडणे झाली होती, त्या सर्वांना पोलिस ठाण्यात आणल्यावर पालकांनाही बोलवण्यात आले. संबंधितांना श्री. गुरव यांनी समज दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baap Re ! Children's Are Carrying Weapons In School Bag