सयाजीराव बहुजनांतले वाङ्‌मय महर्षी - बाबा भांड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जून 2019

कोल्हापूर - बडोदा संस्थानचे सार्वभौम राजे सयाजीराव गायकवाड हे अनेकांचे पोशिंदे होते. ते जसे चारित्र्यसंपन्न, तसेच बहुजन समाजातले वाङ्मयमहर्षी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांनी येथे केले.

कोल्हापूर - बडोदा संस्थानचे सार्वभौम राजे सयाजीराव गायकवाड हे अनेकांचे पोशिंदे होते. ते जसे चारित्र्यसंपन्न, तसेच बहुजन समाजातले वाङ्मयमहर्षी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांनी येथे केले.

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेकानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते ‘सयाजीराव महाराज यांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज’ विषयावर बोलत होते. उद्योजक बंडोपंत सावंत अध्यक्षस्थानी होते. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे व्याख्यानमाला सुरू आहे. 

श्री. भांड म्हणाले, ‘‘सयाजीरावांनी अठराशे ग्रंथ प्रकाशनात व हजारो लेखकांना मदत केली. साहित्यिकाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांनी बदलला. शिक्षणाची ताकद त्यांनी जाणली होती. त्यामुळे गादीवर आल्यानंतर दुसऱ्याच वर्षी सरकारी खर्चाने अस्पृश्‍य व आदिवासी समाजाला शिक्षण देण्याचा पहिला हुकूम त्यांनी काढला. जगातला तो पहिला हुकूम आहे. अस्पृश्‍य व आदिवासींसाठी शाळा व वसतिगृहे सुरू करून सामाजिक क्रांतीचा पाया रचला. महात्मा फुले हंटर कमिशनसमोर कनिष्ठ समाजाला शिकवा, असे सांगत होते. त्याच वेळी सयाजीरावांनी कृतिशील कामास सुरुवात केली होती. ते मूळतः हुशार, जिज्ञासू व मेहनती होते. अवघ्या दहा वर्षांतील त्यांच्या कामाचा ब्रिटिश सरकारला हेवा वाटला.’

ते म्हणाले, ‘‘प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते १८८७ ला इंग्लंडला गेले होते. तेथील विविध क्षेत्रांतील प्रगती पाहून आल्यानंतर त्यांनी ताबडतोब बडोद्यात तज्ज्ञ आणले. बडोद्यात सर्वांत प्रथम भाषांतर शाखा सुरू झाल्या. ते ब्रिटिश सरकारचे मांडलिक नव्हते. सार्वभौम राजे होते. तशी पत्रे त्यांनी गव्हर्नरला लिहिली होती. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी ब्रिटिश सरकारने बावीस वर्षे पाळत ठेवली होती. मात्र, सयाजीरावांच्या अंगी शिवरायांचे गुण होते. त्यामुळेच ब्रिटिश सरकारला त्यांच्या १८ फाईल बंद कराव्या लागल्या.’ सयाजीरावांनी १८९३ ला ब्राह्मणेतरांसाठी वैदिक पाठशाळा सुरू केली. सर्व धर्मांतील पुरोहितांसाठी पुरोहित कायदा केला. ज्याद्वारे त्यांना ज्ञान आहे की नाही, याची परीक्षा घेतली जाऊ लागली. जो पूजाअर्चेत पास त्यालाच लायसन देण्यास सुरवात केली. वाड्यात शाकाहारी व मांसाहारी अशा दोन पंगती ठेवून कनिष्ठ जातीच्या लोकांसमवेत ते पंगतीला बसू लागले. त्यांनी १८८५ ते १९३९ दरम्यान ८८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती सर्व जातीधर्मांतील विद्यार्थ्यांना दिली, असे त्यांनी स्पष्ट केले. 

दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी यांना सयाजीरावांनी आर्थिक मदत केल्याचा उल्लेख करत, श्री. भांड म्हणाले, ‘लोकमान्य टिळकांना टिळक वाडा त्यांना मोफत द्यायचा होता. त्याला ब्रिटिशांचा विरोध होता. त्यातून कागदोपत्री पळवाट काढत तो वाडा त्यांनी अखेर टिळकांनाच दिला. विठ्ठल रामजी शिंदे यांना दोन, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी चार वेळा शिष्यवृत्ती दिली. वस्तुतः केवळ एकदाच शिष्यवृत्ती देण्याचा त्यांचा नियम होता.’ राजू परांडेकर यांनी स्वागत केले. वसंत मुळीक यांनी प्रास्ताविक केले. इंद्रजित सावंत यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. संतोष पाटील यांनी आभार मानले. यावेळी साहित्यिक डॉ. राजन गवस, बंडा यादव, डॉ. संदीप पाटील, शंकरराव शेळके उपस्थित होते.

पालकांना आठ आणे दंड...
सयाजीरावांनी १८९२ मध्ये सर्वांसाठी सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केले. जे पालक मुलांना शाळेत सोडत नाहीत, त्यांना आठ आणे दंड केला. त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी पोलिसपाटलांवर दिली होती, असे श्री. भांड यांनी सांगितले.

जो साक्षर तोच सदस्य
ग्रामपंचायत कायद्याद्वारे जो साक्षर असेल त्यालाच सदस्य होता येईल. नगरपरिषदेवर सदस्य व्हायचे असेल तर दहावी पास हवे. असेंब्लीसाठी पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले हवे, असे कायदे सयाजीरावांनी केले होते. त्यांनी ७५ हजार कायदे केले होते. जे युरोप व अमेरिकेच्या तत्कालीन कायद्यांपेक्षा पुढे होते, असा उल्लेख श्री. भांड यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baba Bhand comment