सोलापूर- सिव्हिलमध्ये जन्मले सयामी बाळ; दोन तोंडं, शरीर मात्र एकच !

परशुराम कोकणे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

सयामी जुळे असलेल्या या बाळावर शस्त्रक्रिया करण्याचे आणि त्याला जगवण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. दोन्हीपैकी एक अन्ननलिका अर्धवट तयार झाली आहे. बाळाची सध्याची स्थिती बरी आहे. 
- डॉ. रवी कंदलगावकर, बालरोग शल्यचिकित्सक

सोलापूर : दोन तोंडं आणि शरीर मात्र एकच अशा अवस्थेत सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) गुरुवारी एका बालिकेचा जन्म झाला आहे. लाखात एखादी घडणारी ही गोष्ट डॉक्‍टरांसाठी आव्हान देणारी आहे. अशा बाळाला सयामी जुळे म्हटले जाते. सिव्हिलमध्ये अशा प्रकारचे बाळ पहिल्यांदाच जन्मल्याचा दावा डॉक्‍टरांनी केला आहे. 

सिव्हिलमध्ये गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास एका महिलेने बाळाला जन्म दिला. स्त्री जातीच्या या बाळाला दोन तोंडे असून शरीर मात्र एकच आहे. एक लाख प्रसूतीमागे एखादे बाळ अशाप्रकारे जन्म घेऊ शकते. प्रसूतीपूर्वी करण्यात आलेल्या सोनोग्राफीत पोटात दोन तोंडं असलेलं बाळ असल्याची कल्पना डॉक्‍टरांनी आईला आणि त्यांच्या कुटुंबाला दिली होती. त्यामुळे त्यांची मानसिक तयार झाली होती. बाळाचे वजन तीन किलो 900 ग्रॅम इतके आहे. दोन तोंडं, दोन अन्ननलिका, दोन श्‍वसननलिका असलेल्या बाळाला शरीर मात्र एकच आहे. 

या बाळाच्या कुटुंबीयांची ओळख सिव्हिल प्रशासनाने गुप्त ठेवली आहे. अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विद्या तिरनकर, बालरोग चिकित्सा विभागातील डॉ. एस. व्ही. सावस्कर, बालरोग चिकित्सक डॉ. सुदर्शन चक्रे, बालरोग शल्यचिकित्सक डॉ. रवी कंदलगावकर हे बाळ आणि आईवर उपचार करीत आहेत. 

गर्भ तयार होतानाच याची सुरवात होते. आई-वडिलांसाठी हे बाळ दुख देणारे असले तरी वैद्यकीय विद्यार्थ्यांना शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी ही चांगली संधी आहे. बाळाच्या हृदयाची गती जास्त आहे. 
- डॉ. सुनील घाटे, अधिष्ठाता 

हृदय आणि फुफुसात अडचणी आहेत. बाळावर शस्त्रक्रिया करता येतील का, हे आम्ही पाहतोय. ही दुर्मिळ घटना म्हणावी लागेल. एक लाखात एखादे असे बाळ जन्म घेऊ शकते. अशा बाळांना जगण्यासाठी अनेक अडचणी असू शकतात. बाळाला सध्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. 
- डॉ. सुदर्शन चक्रे, बालरोग चिकित्सक 

सयामी जुळे असलेल्या या बाळावर शस्त्रक्रिया करण्याचे आणि त्याला जगवण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. दोन्हीपैकी एक अन्ननलिका अर्धवट तयार झाली आहे. बाळाची सध्याची स्थिती बरी आहे. 
- डॉ. रवी कंदलगावकर, बालरोग शल्यचिकित्सक

Web Title: baby born with two head in solapur civil hospital

टॅग्स