esakal | पुणे विभागीय पदवीधरच्या मैदानात भाजपकडूनही बहुजन कार्ड
sakal

बोलून बातमी शोधा

 Bahujan card from BJP in Pune graduates constituency

पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून भाजपने प्रथमच कोअर ग्रुप (परिवार) बाहेर उमेदवारी देताना भाजपचा पाया आणखी प्रशस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

पुणे विभागीय पदवीधरच्या मैदानात भाजपकडूनही बहुजन कार्ड

sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगली ः पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून भाजपने प्रथमच कोअर ग्रुप (परिवार) बाहेर उमेदवारी देताना भाजपचा पाया आणखी प्रशस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी देताना भाजपने यावेळी अनेक मुद्दे विचारात घेतले आहेत. एक क्‍लिन चेहरा तर आहेच, पण शिवाय बहुजन नेतृत्वाचाही विचार प्राधान्याने केला आहे. 

सुरवातीला डाव्या समाजवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात गेल्या 36 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले पाय रोवले. संघाच्या नारायण वैद्य यांनी पहिल्यांदा भाजपचा झेंडा फडकवला. त्याच्यानंतर सध्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दोन वेळा आणि याच कोअर ग्रुपमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. हे सारेच भाजपच्या कोअर ग्रुपमधील मानले जातात.

सेना-भाजपच्या पंचवीस वर्षांच्या युती कालखंडात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी पश्‍चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष देताना भाजपसाठी नेहमीच ओसाड ठरलेल्या या भागात एक एक आमदाराची बेरीज करीत प्रमुख विरोधी पक्षाचे स्थान मिळवले. 2014 मधील सेना-भाजपच्या युती सरकारच्या काळात पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बरोबरीने भाजपचा पक्ष विस्तार केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळात सांगली जिल्ह्यातही भाजपने चार आमदारांच्या बळासह ग्रामपंचायतीसह सर्व निवडणुकांमध्ये स्थान मिळवले. जिल्हा परिषद, महापालिका आणि बाजार समित्यांमध्ये सत्ता मिळवत गल्लीबोळापर्यंत कमळाचे चिन्ह परिचित झाले. भाजपच्या या पक्षविस्ताराचे पुढचे पाऊल म्हणून संग्रामसिंह देशमुख यांच्या उमेदवारीकडे पाहता येईल. 

सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या पाचही जिल्ह्यांत भाजपची म्हणून पदवीधरची यंत्रणा कार्यरत आहे. गेल्या सहा निवडणुकांचा अनुभव या यंत्रणेच्या पाठीशी आहे. यावेळी सुमारे ऐंशी हजारांहून अधिक मतदार नोंदणी भाजपच्या या यंत्रणेच्या माध्यमातून झाल्याचा दावा पश्‍चिम महाराष्ट्राचे संघटक मकरंद देशपांडे यांनी केला आहे. यावेळीही पुण्यात सर्वाधिक मतदार नोंदणी झाली आहे. पुण्यातील मतदान टक्केवारी नेहमीच जास्त असते. भाजपची मोठी भिस्त पुण्यावर आहे. त्यामुळे इथून उमेदवार दिला जाईल, अशी शक्‍यता वर्तवली जात होती, मात्र अनपेक्षितपणे सांगलीत देशमुख यांना संधी देण्यामागे भाजपची काही गृहीतके आहेत.

या जागेसाठी पुण्यात माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह चार जण इच्छुक होते. तिथे उमेदवारी दिल्यास नाराजी पदरी येईल, अशी भीती होती. तिथला निष्ठावान मतदार पुण्याबाहेर उमेदवारी दिली तरी भाजपसोबत राहीलच असे भाजपचे आडाखे आहेत, तर सांगलीतून मकरंद देशपांडे यांचेही नाव आघाडीवर होते; मात्र राज्यात महाविकास आघाडी आहे आणि भाजपला जातीय कोंडीत पकडण्यासाठी ब्राह्मण मुद्दा विरोधकांकडून पुढे आणला जात आहे. त्याला भाजपने काटशह देत बहुजन कार्ड आणले आहे. 

राष्ट्रवादीचा संभाव्य विरोधी उमेदवार बहुजन समाजातीलच असणार हे गृहीत असल्याने तोडीस तोड उमेदवार देण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांचे नाव चर्चेत होते, मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांच्या जिल्ह्यातच सध्या राजकीयदृष्ट्या बॅकफूटवर गेले आहेत. महाडिकविरोधात सर्व अशी मोर्चेबांधणी तिथे गती घेत असल्याने कोल्हापुरातून महाडिक कुटुंबांत उमेदवारी देणे अडचणीचे ठरले असते. तुलनेने सांगली जिल्ह्यात भाजपकडे जिल्हा परिषद, महापालिका आणि दोन आमदार एक खासदार अशी कागदावर तरी बलाढ्य पक्ष म्हणून प्रतिमा आहे. भाजपच्या विस्तारवादाचा ताजा बहुजनवादी चेहरा म्हणून संग्रामसिंह देशमुख यांची निवड झाली आहे. आता तेही लढत किती ताकदीने लढतात यावर भाजपची जिल्ह्यातील मदार राहील. भाजपचे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठीही ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे. 

राष्ट्रवादीपुढे आव्हान... 
भाजपने सर्वांत आधी उमेदवार जाहीर करून राष्ट्रवादीला आव्हान तर दिले आहे. आता राष्ट्रवादीकडून जी चार नावे चर्चेत आहेत, त्यापैकी एक नाव या मतदारसंघासाठी प्रदीर्घकाळ तयारी करणाऱ्या अरुण लाड यांचे आहे. अर्थात तेदेखील याच कडेगाव-पलूस याच मतदारसंघातील आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून आता कोणता उमेदवार मैदानात उतरणार याचीच उत्सुकता बाकी आहे. आप, रयतक्रांती यांचे उमेदवार जाहीर झाले आहेत. डाव्या पक्षाकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. 

संपादन : युवराज यादव