विविधरंगी झेंड्यांनी दसरा चौक झळाळला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

कोल्हापूर - एकच साहेब बाबासाहेब, कडक-कडक निळा भडक आणि एकच पर्व बहुजन सर्व, अशा घोषणांनी बुधवारी शहर दणाणले. "ऍट्रॉसिटी' कायदा कडक करावा, या प्रमुख मागणीसह मराठा, धनगर, मुस्लिम समाज यांना आरक्षण मिळाले पाहिजे आदी मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चात आज दलित, धनगर, मुस्लिम, ख्रिश्‍चन ओबीसी समाजातील नागरिकांनी निळा, हिरवा, पिवळा, केशरी आणि सप्तरंगी झेंडे फडकवून शहराचे लक्ष वेधले.

संविधान सन्मान मोर्चा दोन दिवसांपूर्वी काढला होता. त्या पार्श्‍वभूमीवर बहुजन क्रांती मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मोर्चासाठी काल रात्रीपासून बाहेरगावचे लोक येण्यास सुरवात झाली होती. हातात विविध रंगी झेंडे, गळ्यात रंगीबेरंगी मफलर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहल्याबाई होळकरांसह इतर महापुरुषांचे ताईत घालून लोक दसरा चौकात येत होते. कपाळावर निळा नाम; तसेच चेहऱ्यावर निळा रंग लावून मोर्चात सहभागी झालेल्या तरुणांनी वातावरणात उत्साह आणला.

बेळगावमधूनही भीमसैनिक निळ्या टोप्या आणि फेटे घालून मोर्चात सहभागी झाले. त्यांच्या टोप्यांवर "ऍट्रॉसिटी कायदा कडक करावा' असे वाक्‍य कन्नडमध्ये लिहिले होते. दसरा चौकात शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला भव्य व्यासपीठ उभारले होते.

व्यासपीठासमोरच्या रांगेत महिला व मुलींना बसण्यास प्राधान्य दिले. नगरसेविका स्मिता माने आणि मारुती माने यांनी मोर्चेकऱ्यांना मोफत जेवण वाटप केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांच्या वतीने माजी नगरसेवक महेश यांनी कार्यकर्त्यांसह सरबत वाटप केले.

शिस्तबद्धपणे पाणी, जेवण वाटप
मोर्चेकऱ्यांनी पाणी व जेवण वाटपाच्या ठिकाणी शिस्तबद्धता दाखवून भोजनाचा आस्वाद घेतला. सभेच्या ठिकाणी निळे स्कार्फ, पुस्तकांचे स्टॉल लावले होते. खाद्यपदार्थांच्या गाड्याही लावल्या होत्या.

Web Title: bahujan kranti morcha