बाजीप्रभू, शिवा काशीद यांच्या पुतळ्यांकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जुलै 2016

वीरांच्या शौर्यकथा सांगणारा कार्यक्रम, देखभालीसाठी प्रयत्न गरजेचे
पन्हाळा - वीर बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांचे स्मरण पन्हाळगडावर येताक्षणी व्हावे, या हेतूने तीन दरवाजाजवळ बाजीप्रभूंचा; तर चार दरवाजात शिवा काशीद यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. शिल्पकार रवींद्र मेस्त्री यांनी हे पुतळेही असे बनवले आहेत, की त्यांच्या मुद्रेकडे, हातातील शस्त्रांकडे आणि उभे असताना त्यांनी घेतलेला पवित्रा लक्षात घेतला, तरी पाहणाऱ्याच्या नजरेसमोर वाचलेल्या इतिहासाच्या पुस्तकातील शौर्यदायी प्रसंग आपोआप डोळ्यांसमोर उभे राहावेत.

वीरांच्या शौर्यकथा सांगणारा कार्यक्रम, देखभालीसाठी प्रयत्न गरजेचे
पन्हाळा - वीर बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांचे स्मरण पन्हाळगडावर येताक्षणी व्हावे, या हेतूने तीन दरवाजाजवळ बाजीप्रभूंचा; तर चार दरवाजात शिवा काशीद यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. शिल्पकार रवींद्र मेस्त्री यांनी हे पुतळेही असे बनवले आहेत, की त्यांच्या मुद्रेकडे, हातातील शस्त्रांकडे आणि उभे असताना त्यांनी घेतलेला पवित्रा लक्षात घेतला, तरी पाहणाऱ्याच्या नजरेसमोर वाचलेल्या इतिहासाच्या पुस्तकातील शौर्यदायी प्रसंग आपोआप डोळ्यांसमोर उभे राहावेत.

सह्याद्रीच्या कड्यावरील पन्हाळगड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेला. आदिलशहाचा सरदार सिद्दी जोहारच्या वेढ्यात शिवाजी महाराज पन्हाळगडी अडकल्यावर त्यांनी विश्‍वासू सरदार बाजीप्रभू देशपांडे आणि हेर शिवा काशीद यांच्याबरोबर खलबत केले. शिवा काशीदला प्रति शिवाजी बनवून शत्रूपक्षाला हूल दिली. पावनखिंडीत बाजीप्रभूंनी राजे विशाळगडी पोचेपर्यंत शत्रूला रोखले. या दोघा वीरांमुळेच शिवाजी महाराज पन्हाळगडावरून सुखरूप निसटून विशाळगडी पोचू शकले. मृत्यू डोळ्यांसमोर दिसत असतानाही या दोघा वीरांनी आपल्या राजासाठी, स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली. आज (ता. १३ जुलै) त्यांची पुण्यतिथी. स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या या वीरांचे पुतळे पन्हाळगडावर उभारले. सुरवातीला त्यांची निगाही व्यवस्थित राखली. रात्रीच्या वेळीही त्यांचे अस्तित्व ध्यानात येण्यासाठी त्यांच्यावर विद्युत दिव्यांचे प्रखर प्रकाशझोत सोडले. पण हे काही दिवसच. वास्तविक, गडावरील छत्रपतींच्या पुतळ्यासह या दोन्हीही पुतळ्यांची नियमित पूजा, त्यांना दररोज किमान फुलांचा हार घालणे, पुतळ्यांजवळ कायमस्वरूपी झेंडा फडकत ठेवणे ही कामे नगरपरिषदेकडून होणे अपेक्षित होते. तथापि, जयंती, पुण्यतिथी अगर अन्य काही कार्यक्रमांवेळीच या पुतळ्यांकडे संबंधितांचे लक्ष जाते. एवढेच काय, महिनोन्‌महिने ते अंधाराच्या साम्राज्यात असतात. पुतळ्यांचा परिसर नेहमी उजळलेला राहावा, यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. पन्हाळगड-विशाळगड पदभ्रमंतीवेळी, तसेच शिवजयंतीच्या दिवशी मात्र या पुतळ्यांभोवती छायाचित्र काढण्यासाठी तोबा गर्दी होते.

हे करता येईल...
किल्ले रायगडावर दररोज जाऊन पूजा करणारी काही शिवप्रेमी मंडळी आहेत. याच धर्तीवर मध्यंतरी काहींनी दररोज वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्याची पूजा करण्याचे व्रत जोपासण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अल्पायुषी ठरला. फक्‍त जयंती, पुण्यतिथीवेळी येथे येऊन मोठा समारंभ करण्यापेक्षा संबंधितांनी, संस्थांनी दररोज या पुतळ्यांची निगा राखण्याची, त्यांच्या पूजेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. या नरवीरांच्या शौर्याविषयी माहिती देणारे फलक नगरपालिकेने लावले पाहिजे. ‘लाइट अँड म्युझिक शो’ सुरू केल्यास आणि गाइड मंडळींनी या वीरांचा इतिहास सांगितल्यास पर्यटकांना समाधान मिळेल.

जीर्णोद्धार धूमधडाक्‍यात; नंतर दुर्लक्ष
वीर शिवा काशीद यांच्या नेबापूर येथील समाधिस्थळाचा नुकताच जीर्णोद्धार झाला. त्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांनी लोकसहभागातून तसेच वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना येथे आणून सरकारचा निधी खेचून आणला. परिसराचे नंदनवन केले. लोकार्पण सोहळाही मोठ्या धूमधडाक्‍यात झाला. सुरवातीचे काही दिवस या परिसराकडे सगळ्यांनीच लक्ष दिले; कालांतराने सर्वांचेच दुर्लक्ष झाले. शिल्पांचे रंग उडून गेले. त्याच्या परिसरात लावलेली आणि तरारून आलेली झाडे वणव्यात गेली. परिसराच्या रक्षणासाठी नेमलेले रक्षक दिसेनासे झाले. पिण्याच्या पाण्यासाठी बसवलेल्या टाक्‍यांच्या चाव्या फिरेनाशा झाल्या. भारत पाटील यांनी शिवा काशीद यांच्या समाधीला न्याय देण्याचे काम केले; त्यामुळे पर्यटक येथे येऊ लागले. पण या परिसरात आता कोणी लक्ष घालायचे याबाबत वादविवाद होत आहेत.

Web Title: Bajiprabhu, Shiva ignored kasida of statue