कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून बाजीराव खाडेंना हवी उमेदवारी

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून बाजीराव खाडेंना हवी उमेदवारी

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे सचिव बाजीराव खाडे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. खाडे यांच्या मागणीने या मतदारसंघातील इच्छुकांच्या स्पर्धेत आणखी एक नाव वाढले आहे. 

संपूर्ण कोल्हापूर महापालिकेचे कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघावर १९८० व २००४ चा अपवाद सोडला तर काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला नाही. १९८० मध्ये कै. लालासाहेब यादव, तर २००४ मध्ये मालोजीराजे छत्रपती हे या मतदार संघातून आमदार झाले होते. या दोन्हीही निवडणुकीत या मतदारसंघात सध्या येणारा कसबा बावडा व परिसर त्यावेळी करवीर विधानसभा मतदार संघात समाविष्ट होता. २००९ मध्ये विधानसभा मतदार संघाची पुर्नरचना झाली. त्यात कोल्हापूर उत्तर या नव्या मतदारसंघाची निर्मिती झाली आहे. सध्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर या मतदारसंघाचे सलग दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्त्व करत आहेत. 

२०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघातून नगरसेवक सत्यजित कदम यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. सध्या कदम हे भाजपसोबत महापालिकेत एकत्र असलेल्या ताराराणी आघाडीचे गटनेते आहेत. त्यामुळे यावर्षीच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीचा विचार अशक्‍य आहे. दुसरीकडे दौलत जयकुमार देसाई यांनीही अलीकडेच उमेदवारी मिळवायची ठरवून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज यांनी वाढदिवसानिमित्त शहरभर लावलेल्या फलकातून याच मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचे माजी आमदार मालोजीराजे व कुटुंबीय २००९ पासून राजकारणातून अलिप्त आहेत. अशा परिस्थितीत देसाई व ऋतुराज हे दोनच उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. खाडे यांच्या रूपाने तिसरा इच्छुक या स्पर्धेत उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोल्हापूरचे आतापर्यंतचे आमदार

  •   १९७२   त्र्यंबक सीताराम कारखानीस (शेकाप) 
  •   १९७८     रवींद्र सबनीस (जनता दल)
  •   १९८०     लालासाहेब यादव (काँग्रेस)
  •   १९८५     डॉ. एन. डी. पाटील (शेकाप)
  •   १९९०     दिलीप मल्हारराव देसाई (शिवसेना) 
  •   १९९५,१९९९     सुरेश साळोखे (शिवसेना)
  •   २००४      मालोजीराजे छत्रपती
  •   २००९, २०१४      राजेश क्षीरसागर (शिवसेना)

काँग्रेसला मानणारा मतदारसंघ : खाडे
मी १९९६ पासून काँग्रेसची विचारधारा समजून पक्षासाठी कार्य करत आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर अनेक युवकांना पक्षाची विचारधारा पटते. या सर्वांना सोबत घेऊन काम करायची इच्छा असल्याने उमेदवारी मागितली आहे. तरीही पक्ष ज्यांना उमेदवारी देईल त्याच्यामागे हे संघटन उभे केले जाईल, अशी प्रतिक्रिया बाजीराव खाडे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com