एका हाताने लढण्याची जिद्द

सुधाकर काशीद
शुक्रवार, 15 जून 2018

कोल्हापूर - ‘हात कापून काढावा लागणार, नाही तर तुमच्या जीवालाच धोका आहे’, असे डॉक्‍टरांनी सांगितल्यावर बाजीराव हबकलाच; पण मृत्यूपेक्षा एका हातावर तरी भागतंय म्हणून तो तयार झाला. भूल दिली आणि त्याचा हात कापून काढला. बाजीराव शुद्धीवर आला तसा आपल्याला उजवा हात नाही हे पाहून गारठून गेला. पण त्याला गारठून चालणार नव्हते. कारण दोन हातावरचे पोट एका हातावर चालवायलाच लागणार होते. 

बाजीराव नामदेव साठे (वय ५२) या कोल्हापूर महापालिका झाडू कामगाराच्या एका हाताची ही कथा आहे. कचरा उठाव करणाऱ्या ट्रकवरचा तो कामगार. पाच महिन्यांपूर्वी जुन्या पुलावर कचरा ट्रकमध्ये भरताना बाहेर पडत होता म्हणून त्याने हाताने कचरा दिला. त्यावेळी बाजीरावच्या बोटाला काही तरी टोचले. दुसऱ्या दिवशी बोट सुजले. तरीही किरकोळ म्हणून त्याने घरगुतीच उपचार केले; पण तिसऱ्या-चौथ्या दिवशी बोटाची हालचाल बंद झाली. संपूर्ण हात सुजला आणि काळा निळा पडला. खासगी दवाखान्यात उपचार सुरू करण्यापूर्वी त्याला बारा हजार रुपये भरायला सांगितले. एवढे पैसे नसल्याने तो परत आला व दुसऱ्या दिवशी सीपीआरमध्ये गेला. 
तेथे तपासणी झाली व डॉक्‍टरांनी गॅंगरीन झाल्याचे सांगून तातडीने हात काढला नाही तर जीवाला धोका असल्याचे स्पष्ट केले. त्यापुढचा धक्कादायक प्रकार असा की हात कापून काढण्यासाठी जी काही हत्यारे लागत होती ती इस्पितळात नसल्याने बाहेरून विकत आणण्यास बाजीरावला सांगितले. बाजीराव आपल्या मुलासोबत जाऊन आपल्याच हाताने आपला हात कापण्यासाठी हत्यारे घेऊन आला. बिल तीन हजार चारशे रुपये झाले. 

त्यानंतर त्याचा हात कापून टाकण्याची शस्त्रक्रिया झाली. आपला जीव हातावर भागतो म्हणून तयार झालेल्या बाजीरावने उजव्या हाताकडे पाहिले आणि हात नसल्याचे पाहून तो गदगदून रडू लागला; तीन महिने त्याने रजा घेतली. काही दिवसांपूर्वी तो पुन्हा हजर झाला आहे. कचरा वेचताना हातात ग्लोव्हज का घातले नव्हते असे विचारले तर ‘‘साहेब, कोणी ग्लोव्हज द्यायला नको का?’’ एवढेच म्हणतो. उजव्या बाजूला हाताकडे बघतो आणि स्वतःशीच हसतो.

डाव्या हाताने सराव
आरोग्य विभागाने त्याला रात्रपाळीत या विभागात बसून कामाच्या नियोजनाचे काम दिले आहे. आता तो रात्रभर या विभागात बसून असतो. उजवा हात गेल्याने डाव्या हाताने सगळे काही करायचा सराव करतो.

Web Title: bajirao sathe story