बेळगावसह चार तालुक्‍यांना होणार लाभ ; बळ्ळारी नाला योजना होणार पुन्हा कार्यान्वित 

Ballari Nala scheme will be reactivated
Ballari Nala scheme will be reactivated

जुने बेळगाव - बळ्ळारी नाला योजनेला शासनाने पुन्हा एकदा जोर दिला आहे. 2010 साली बंद पडलेली ही योजना पुन्हा कार्यान्वित होत असून पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी याबाबतची घोषणा केली आहे. योजना पूर्णत्वास आल्यास बेळगावसह चार तालुक्‍यातील 14,786 हेक्‍टर प्रदेशातील जमीन ओलीताखाली येणार आहे. 

2008 साली बळ्ळारी नाला योजनेची घोषणा करण्यासह शासनाने त्यासाठी अनुदानही मंजूर केले होते. त्यानुसार वनखात्याच्या अखत्यारितील 269.47 हेक्‍टर जमीन घेऊन त्याबदल्यात अन्यत्र वनखात्याला जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासह अनेक शेतकऱ्यांनी कालव्यासाठी स्वतःहोऊन जमीन दिली होती. त्यामुळे दोन वर्ष हे काम चालले. मात्र 2010 साली वनखात्याकडून हस्तांतरीत होणारी जमिनीची प्रक्रिया लांबणे, अनुदानाची कमतरता आदी कारणांमुळे योजना ठप्प झाली. नाला योजना हाती घेण्यासाठी 20 एप्रिल 2010 रोजी वनखात्याकडून मंजुरी घेण्यात आली. एनपीए शुल्क म्हणून वनखात्याला 33 कोटी 54 लाख रुपये देण्यात आले. तर बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्‍यात वनखात्याला पर्यायी जमीन म्हणून 116.96 हेक्‍टर तर बेळगाव जिल्ह्यात बैलहोंगल तालुक्‍यात 64.06 हेक्‍टर जमीन देण्यात आली. आणखी 88.64 हेक्‍टर पर्यायी जमीन देण्याची प्रक्रिया रखडली असून तीही आता मार्गी लावली जात आहे. योजनेची पूर्तता झाल्यास बेळगाव, गोकाक, बैलहोंगलमधील 37 गावांतील 8,200 हेक्‍टर तर सौंदत्ती तालुक्‍यातील 22 गावातील 6,586 हेक्‍टर जमीन ओलीताखाली येणार आहे. 

बळ्ळारी नाल्याची सुरुवात येळ्ळूर शिवारातून होते. येळ्ळूर शिवारातून वडगाव, अनगोळ, जुने बेळगाव येथून बसवन कुडची गावामार्गे कणबर्गी येथून नाला गोकाककडे जातो. पुढे हा नाला नदीला मिळतो. बळ्ळारी नाल्यावर धरणही बांधण्यात आले असून ते अपूर्ण अवस्थेत आहे. बेळगाव तालुक्‍यातून गेलेल्या नाल्यात शहराचे सांडपाणी सोडले जाते. नाल्यात गाळ साचल्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी नाल्याला पूर येतो. सध्या ठिकठिकाणी नाल्याला जलपर्णीचा विळखाही पडला असून शहरातील अनेक ठिकाणी नाल्यावर अतिक्रमण करुन बांधकाम झाले आहे. योजनेची पूर्तता करतानाच नाल्यावर अतिक्रमण हटवून गाळ काढल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. 

पुराचा शेतकऱ्यांना फटका 
बेळगावात बळ्ळारी नाला परिसरातील अनेक शेतकरी नाल्याच्या पाण्यावर भात, कोथिंबीर व भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतात. त्यांना ही योजना फायदेशीर ठरु शकते. परंतु, अमिक्रमणामुळे पाणी अडत असल्याने दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com