चांगभलंच्या गजरात बाळूमामाचा भंडारा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

गारगोटी - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील संत बाळूमामा यांची भंडारा यात्रा उत्साही व भक्तिमय वातावरणात झाली. या वेळी भाविकांनी "बाळूमामाच्या नावानं चांगभलं'चा जयघोष करीत भंडाऱ्याची मुक्त उधळण केली. तीन दिवसांत लाखो भाविकांनी समाधीस्थळाचे दर्शन घेतले. महाप्रसादाचा लाभ घेतला. 

भंडारा उत्सवानिमित्त आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. यात्रेनिमित्त अनेक पायी दिंड्या आदमापुरात दाखल झाल्या होत्या. शुक्रवारी रात्री जागर झाला. भाविकांनी फटाक्‍यांची आतषवाजी केली. भाविकांनी वालंग वादन व भजन गायन करून रात्र जागविली. पुजारी कृष्णात डोणे (वाघापूर) यांची भाकणूक झाली. शनिवार यात्रेचा मुख्य दिवस होता. यादिवशी लाखो भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला. 

आज रविवारी सकाळी देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. बाळूमामा मंदिर, मरगूबाई मंदिर, हनुमान मंदिर परिसराह गावातून निघालेल्या पालखी सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. बाळूमामांचा जयघोष करीत भाविकांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केली. पालखी सोहळ्यात "अश्‍व नाच' लक्षवेधी ठरला. देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, सरपंच नेहा पाटील, "गोकुळ'चे माजी संचालक दिनकरराव कांबळे, माजी सभापती दत्तात्रय पाटील यांच्यासह देवस्थानचे व स्थानिक पदाधिकारी, युवकांनी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, प्रभारी तहसीलदार शीतल देसाई, पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्यासह शासकीय यंत्रणेने यात्रा नियोजनासाठी विशेष सहकार्य केले. यावेळी बिद्री येथील स्वराज्य फोर्सच्या जवानांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. 

Web Title: balumama bhandara