
Bangalore : येडियुराप्पा यांच्या घरावरील हल्लाप्रकरणी आरोप-प्रत्यारोप
बंगळूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संसदीय मंडळाचे सदस्य बी. एस. येडियुराप्पा यांच्या निवासस्थानावरील हल्ल्यामागे काँग्रेस नेत्यांचा कट असल्याचा आरोप मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला. तर या हल्यामागे भाजपचे नेते संतोष गटाचा हात असल्याचा प्रत्यारोप कॉंग्रेसने केला आहे.
मंगळवारी शहरात पत्रकारांशी संवाद साधताना बोम्मई म्हणाले, ‘‘काँग्रेसने ठिकठिकाणी युक्त्या केल्या आहेत. पोलिसांना सापडलेल्या कॅमेऱ्यात काँग्रेस नेते आहेत. याबाबत डी. के. शिवकुमार यांचे आणखी काय म्हणणे आहे? काँग्रेस नेत्यांनी दुसऱ्या दिवशी बंजारा समाजाची दिशाभूल केली आणि त्यांना एससी यादीतून काढून टाकले जाईल, असे खोटे बोलले. काँग्रेसने रात्री बैठक घेतली. योजना आखली आणि पद्धतशीरपणे तसे केले. हे पुराव्यानिशी सांगत आहे.
कॉंग्रेसचा संतोष गटावर आरोप
येडियुराप्पा यांच्या घरावरील हल्ल्यामागे भाजपचे नेते संतोष यांच्या गटाचा हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. येडियुराप्पा यांच्या घरावरील हल्ल्याबाबत बोलताना काँग्रेसने ट्विट केले की, ‘‘येडियुराप्पा हे मुख्यमंत्री नाहीत. त्यांची सरकारच्या निर्णयांमध्ये कोणतीही भूमिका नाही, पण सरकारच्या हस्तक्षेपामुळे येडियुराप्पांच्या घरावर हल्ला का झाला, असा प्रश्न गुप्तचर विभागाने का केला? पोलिस खाते डोळेझाक का करते?
गृहमंत्र्यांचा गृहजिल्हा असलेल्या शिमोगामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघण झाले आहे. दंगली आणि संघर्षाची बिजे का पेरली जात आहेत? ही जबाबदारी गृहमंत्री ज्ञानेंद्र यांची आहे. ते आपल्या गावात कायदा व सुव्यवस्था राखू शकत नाहीत. संतोष यांच्या गटाला खूश करण्याचे कारस्थान आहे काय?, असे म्हणत काँग्रेसने टीका केली आहे.