
Bangalore : शिमोगा, बागलकोटला आरक्षणविरोधी आंदोलन
बंगळूर : अनुसूचित जातींमधील अंतर्गत आरक्षणाबाबत न्यायमूर्ती ए. जे. सदाशिव आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्राला शिफारस करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात बंजारा समाजाचे आंदोलन आजच्या दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले.
आता हे आंदोलन शिमोगा आणि बागलकोट जिल्ह्यात पसरले आहे. शिमोगा तालुक्यातील कुंचेनहळ्ळीत जाळपोळ झाल्याची घटना घडली. बागलकोट येथील अनेक तांडांमध्ये बंजारा समाजाचा संताप उसळला आहे.
मंगळवारी कुंचेनहळ्ळी येथे बंजारा समाजाने रास्ता रोको केल्याने शिमोगा ते शिकारीपूर दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली. शिवमोगा ते सावलंगा जोडणाऱ्या रस्त्यावर वाहने अडकून पडली. आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
बागलकोट जिल्ह्यात पडसाद
बंजारा समाजाने आज बागलकोट जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करून आपला संताप व्यक्त केला. बिळगी तालुक्यातील सुनागा तांडा, बागलकोट तालुक्यातील मुचखंडी तांडा, हुनगुंद तालुक्यातील अमीनगड तांडा, कामतगी तांडा, अचनूर तांडा, नीलानगर तांडा, लवलेश्वर तांडा, जावळेश्वर तांडा, शिरगुप्पी तांडा आणि इतर ठिकाणी उग्र निदर्शने झाली.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई समाजातील लोकांशी चर्चा करून आरक्षणाचे प्रश्न सोडविण्यास तयार आहेत. त्यामुळे त्यांनी कायदा हातात घेऊ नये, असे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी शिकारीपूर येथे सांगितले. सर्व समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने एक पाऊल उचलले आहे, असेही ते म्हणाले. गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी खासदार बी. वाय. राघवेंद्र, जिल्हा पोलिस प्रमुख जी. के. मिथुनकुमार यांच्यासोबत बैठक घेतली.