सहकारी दूध संघांना आता अनुदानाचाच आधार

तात्या लांडगे
शुक्रवार, 20 जुलै 2018

पिशव्यातून विक्री केल्यानंतर शिल्लक राहणारे दूध हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. परंतु, आता त्यासाठी अनुदान मिळणार असल्याने खासगी संघांकडून होणारी दूध उत्पादकांची लूट थांबण्यास मदत होणार आहे.

सोलापूर : राज्यातील 70 पैकी सुमारे 32 सहकारी दूध संघ सध्या अडचणींचा सामना करीत असून प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाच्या निर्णयामुळे आता त्यांना अडचणीतून सावरण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच पिशव्यांमधून विक्री होणारे दूध वगळून शिल्लक दूधावरच हे अनुदान दिले जाणार असल्याने अतिरिक्‍त दूधाचा प्रश्‍नही मार्गी लागणार आहे.

सद्यस्थितीत जनावरांच्या चाऱ्यांचे दर वाढले असून सध्याचा दूध दर उत्पादकांना परवडत नव्हता. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या दूधबंद आंदोलनानंतर राज्य सरकारने प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले. त्यामुळे राज्यातील दूध उत्पादकांसह सहकारी संघांनाही त्याचा लाभ होणार आहे. शासनाच्या नियंत्रणाविना सुरु असलेल्या राज्यातील सुमारे तीन हजार खासगी दूध संघांपैकी बहुतांशी संघांकडून सहकारी दूध संघांपेक्षाही कमी दर दिला जात होता.

पिशव्यातून विक्री केल्यानंतर शिल्लक राहणारे दूध हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. परंतु, आता त्यासाठी अनुदान मिळणार असल्याने खासगी संघांकडून होणारी दूध उत्पादकांची लूट थांबण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारकडून आता शिल्लक दुधापासून पावडर तयार करण्यासाठी व निर्यातीसाठी अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे शिल्लक दूधाचा प्रश्‍नही या अनुदानाच्या माध्यमातून मार्गी लागेल, असा विश्‍वास राज्याच्या दुग्ध विभागाकडून व्यक्‍त करण्यात आला. 

आकडे बोलतात... 

एकूण दूध संकलन 
1.34 कोटी लिटर 
पिशवीद्वारे विक्री होणारे दूध 
79.60 लाख लीटर 
अतिरिक्‍त दूध 
54.39 लाख लीटर 
राज्याच्या तिजोरीवर भार 
दैनंदिन 2.72 कोटी

Web Title: The basis of subsidy to milk union