Nag Panchami 2021: सांगलीचा महापूर सापांच्या जीवावर

कुशल सर्पमित्र तयार होणे आवश्‍यक
snake defense information by belgaum
snake defense information by belgaum

सांगली : महापुरासारखे नैसर्गिक संकट आणि अकुशल सर्पमित्र यांमुळे नागासह बहुतांश सापांचा अधिवास असुरक्षित झाला आहे. जंगल असो, शेती वा मानवी वस्तीचा परिसर; तेथे रुळलेला साप नव्या जागी रुळत नाही. एकतर तो बिथरतो, घाबरतो, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतो किंवा त्या परिसरातील साप त्याला मारून टाकतात. या साऱ्याचा परिणाम म्हणून पन्नास टक्केच साप जगतात, असे एका संशोधनातून समोर आल्याचे जागतिक ख्यातीचे सर्पतज्ज्ञ निलीमकुमार खैरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

नुकताच कृष्णा नदीला महापूर आला. त्यातून शेकडो नाग, फुरसे, घोणस, धामण वाहून आले. कोयना आणि चांदोलीच्या घनदाट जंगलात अधिवास असलेले हे सर्प आता या भागात जगतील का? या मुद्यावर खैरे यांच्याशी नागपंचमीच्या पार्श्‍वभूमीवर संवाद साधला. त्यावर त्यांनी या प्रश्‍नावर सखोल अभ्यासाची गरज व्यक्त केली.

ते म्हणाले, ‘‘साप जगणे हे मानवी वस्तीसाठी अत्यंत आवश्‍यक आहे. एक धामण वर्षाकाठी काही हजार उंदरांचे नियंत्रण करते. माणूस सापाला शत्रू मानतोच आणि आज सर्पमित्र म्हणून स्वयंघोषित लेबल लावून फिरणारेही त्याच्यासाठी घातक ठरत आहेत. सर्पमित्र गरजेचे आहेत, मात्र ते कुशल हवेत. कुणाकडून तरी शिकून साप पकडणे वेगळे आणि शास्त्रीयदृष्ट्या त्याचे प्रशिक्षण घेऊन, त्या सापाविषयी लोकशिक्षण चळवळ चालवणे वेगळे. साप पकडून कुठे सोडावा? याची माहिती नव्या सर्पमित्रांना आहे का? खरेतर त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. कारण, सापांसाठीदेखील मूळ अधिवास अत्यंत महत्त्वाचा आहे.’’

ते म्हणाले, ‘‘एखादा नाग एका विशिष भागात खूप काळ राहिला तर त्याला त्याचे घर, लपायच्या जागा, त्याचे खाद्य याची पुरेपूर माहिती असते. त्याला वीस-पंचवीस किलोमीटर दूर जंगलात सोडले, तर तो अस्वस्थच होतो. ना त्याला घर सापडते, ना लपायच्या जागा, ना त्याच्या सवयीचे खाद्य. अनेक वर्षे तो फक्त उंदीर खावून जगला असेल आणि जंगलात ते मिळालेच नाहीत तर? चांदोलीच्या जंगलातून महापुरात वाहत जावून तो अलमट्टीच्या रुक्ष परिसरात पोचला तर खाणार काय? त्यामुळे महापूर हे सापांसाठीही जीवघेणेच ठरत आहेत.’’

snake defense information by belgaum
भरतीसाठी उंचीची युक्ती आली अंगलट ; दोन तरूणांचे पितळ उघड

शिराळ्यात व्हावे सर्प विद्यापीठ

शिराळ्याची नागपंचमी जगप्रसिद्ध होती. तेथे खऱ्या अर्थाने सर्प विद्यापीठ झाले पाहिजे. साप या विषयावर जागतिक संशोधनाची आवश्‍यकता आहे. नव्या जाती, त्यातील बदल यांवर अभ्यास व्हायला हवा. ज्याला कुणाला सर्पांविषयी अभ्यास करायचा आहे, त्यांना शिराळ्यातील विद्यापीठात यावेसे वाटेल, असे विद्यापीठ कुशल सर्पमित्रांनी आणि अभ्यासकांनी घडवावे, असे निलीमकुमार खैरे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com