महापूर ओसरतोय, आता साथीचे रोग टाळण्यासाठी ही काळजी घ्या

Be aware and try to avoid contagious diseases after flood
Be aware and try to avoid contagious diseases after flood

सांगली : सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा या नद्यांना आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये तसेच इतर गावांमध्ये पाणीजन्य व कीटकजन्य आजारांची साथ होण्याची शक्यता आहे. तरी साथीचे रोग टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन सांगली जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

यामध्ये लॅप्टोस्पायरोसीस या आजारामध्ये तापासोबत तीव्र अंगदुखी, डोकेदुखी आणि त्यानंतर त्वचेखाली तोंडात आणि डोळ्यामध्ये बारीक स्वरूपाचा रक्तस्त्राव होतो. हे आजाराचे प्राथमिक लक्षण आहे. हा आजार १०० टक्के बरा होऊ शकतो. शासनाने यासाठी भरपूर औषध साठा उपलब्ध करून दिला आहे. रूग्णांनी तात्काळ वैद्यकीय अधिकारी / डॉक्टर यांच्याकडे जावे. घाण पाण्याच्या डबक्यातून जाणे टाळावे. विशेषत: जखमा असताना जावू नये. किरकोळ जखमा व चिखल्या झाल्या असतील तर कँडीड-बी आणि सोप्रामायसिन सारखे मलम लावावेत म्हणजे त्या बऱ्या होतील. जखमा असणाऱ्या व्यक्तींनी दूषित पाणी, अन्न व भाजीपाल्याशी संपर्क टाळावा.

डेंग्यू या आजारामध्ये तीव्र अंगदुखी, डोकेदुखीसह अचानक वाढणारा ताप आणि डोळे लाल होणे हे प्राथमिक लक्षण आहे. अशा रूग्णांनी त्वरीत आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी अथवा डॉक्टरांशी संपर्क साधावा. घराभोवती केरकचरा, रिकामी पिंप, टायर्स, तसेच बॅटरी इत्यादी अनावश्यक बाबींमुळे पाणी साचून डासांची निर्मिती होते. त्याची त्वरीत विल्हेवाट लावावी व पाणी साचले असल्यास त्याचा निचरा करून परिसर स्वच्छ ठेवावा. घराभोवतालचा परिसर स्वच्छ करून जंतुनाशक पावडर टाकावी. गटारी साफ करून वाहत्या कराव्यात. पाण्याची डबकी बुजवावीत. कायमस्वरूपी डास उत्पत्ती स्थाने, तलावात, विहिरीत गप्पी मासे सोडावेत. घरातील पाणी साठविण्याची भांडी आठवड्यातून एकदा कोरडी करावीत. छतावरील पाण्याच्या टाक्यांना झाकण लावावे. संडासच्या व्हेंट पाईपला जाळी लावावी.

कॉलरा या आजारामध्ये दिवसातून पाच वेळापेक्षा जास्त पातळ शौचास होणे आणि हातापायाला पेटके येणे ही प्राथमिक लक्षणे आहेत. पिण्याचे पाणी मेडीक्लोअर किंवा क्लोरीन गोळी वापरून निर्जंतुक करून प्यावे. वरील लक्षण दिसताच भरपूर पाणी व द्रव पदार्थ (कांजी, तांदळाचे पेज, डाळीचे पाणी, शहाळाचे पाणी, लिंबू, सरबत इत्यादी) प्यावे. तात्काळ आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी अथवा डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com