दाजीपूर अभयारण्यात अस्वलांचा वावर ठळक

सुधाकर काशीद
सोमवार, 29 एप्रिल 2019

एक नजर

  • दाजीपूर, राधानगरी अभयारण्य परिसरात गवे तर दिसतातच; पण आता अस्वलांचेही अस्तित्व. 
  • अभयारण्य परिसरात ३२ ट्रॅप कॅमेऱ्यात अस्वले सहजपणे ट्रॅप. 
  • अभयारण्य आसपासच्या परिसरात अन्यत्र अस्वलाच्या पायाचे ठसे, ठिकठिकाणी पडलेली त्याची विष्ठा यातूनही अस्वलाचा वावर ठळकपणे स्पष्ट.
  • पाटगाव, सिद्याची गुहा या परिसरातील जंगलात अस्वलांचा वावर

कोल्हापूर - दाजीपूर, राधानगरी अभयारण्य परिसरात गवे तर दिसतातच; पण अलीकडे अस्वलांचे अस्तित्व अधिक जाणवू लागल्याने जैवविविधतेच्या दृष्टीने ते चांगले चित्र मानले जाऊ लागले आहे. या अभयारण्य परिसरात ३२ ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत. त्यात अस्वलेच सहजपणे ट्रॅप झाली आहेत. याशिवाय अभयारण्य  आसपासच्या परिसरात अन्यत्र अस्वलाच्या पायाचे ठसे, ठिकठिकाणी पडलेली त्याची विष्ठा यातूनही अस्वलाचा वावर ठळकपणे जाणवू लागला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वी पाटगाव, सिद्याची गुहा या परिसरातील जंगलात अस्वलांचा वावर होता व आजही आहे. या जंगलात शिकारी प्रवेश करायला धजावत नाहीत. किंबहुना वाघ, बिबट्यापेक्षा अस्वलाला अधिक घाबरतात. कारण अस्वलाचा हल्ला म्हणजे मरण किंवा मरण यातना भोगाव्या लागणाऱ्याऱ्या जखमा असतात. विशेषतः सोबत पिले असताना समोर माणूस आला तर आपल्या पिलांच्या सुरक्षिततेसाठी अस्वल हल्ला करते. राधानगरी व दाजीपूर परिसरात दोन-तीन वर्षांत अस्वलांचे अस्तित्व जाणवू लागले. विशेषतः डिगस भागात मध उत्पादनाचा व्यवसाय शेतकरी करतात. त्यामुळे त्या मधाच्या पेट्यावर ताव मारण्यासाठी अस्वले येतात. मधाच्या पेट्या कितीही सुरक्षित ठेवल्या तरी अस्वले त्याचा माग काढतात.

अस्वल दिवसभर दाट जंगलात असते. त्यामुळे ते पर्यटकांच्या नजरेस सहजपणे येत नाही; पण दिवस मावळला की ते बाहेर पडते. अस्वल आपल्या पिलांना खूप जपते. त्यामुळे माणसांवर हल्ला करण्याची शक्‍यता जास्त असते. राधानगरी व दाजीपूर परिसरात सध्या ३२ ठिकाणी ट्रॅप कॅमेरे आहेत. हे कॅमेरे उच्च दर्जाचे आहेत. रात्रीच्या वन्यप्राण्यांच्या हालचालीही त्यात टिपल्या जातात. त्यामुळे राधानगरी परिसरात अनेक कॅमेऱ्यात अस्वले ट्रॅप झाली आहेत. 

एखाद्या जंगलात अस्वलांचा वावर असणे हे जैववैविधतेचे प्रतीक मानले जाते. अस्वलांची संख्या वाढल्याचे कारण म्हणजे त्याच्या वाट्याला कोणी माणूस जाऊ शकत नाही. वाघ, बिबट्यासारखा प्राणीही अस्वलाची फारशी शिकार करत नाही. त्यामुळे नैसर्गिक मृत्यू झाला तरच अस्वलाची संख्या कमी होते. आणि जंगलात अस्वलाची संख्या वाढली किंवा जंगलालगतच्या गावात त्यांचा त्रास सुरू झाला म्हणून अस्वले पकडून इतरत्र सोडणे असा प्रकार कधीच केला जात नाही. कारण त्या त्या भागात त्या त्या वन्य प्राण्याचा अधिवास असतो. त्याला धक्का पोचून चालत नाही. 

या पार्श्‍वभूमीवर दाजीपूर, राधानगरी, परिसरात अस्वलांचा वावर वाढला आहे. त्यामुळे पट्टेरी वाघ, बिबट्या, हरण, भेकर, गवे या बरोबरच अस्वलांसाठी राधानगरी, दाजीपूर, अभयारण्य आता ओळखले जात आहे. 

अस्वलांची संख्या जरूर वाढली आहे. अस्वलाला पूरक खाद्य जंगलात भरपूर आहे. मानवी वस्तीत शिरून अस्वलाचा हल्ला वगैरे प्रकार घडलेले नाहीत. त्यामुळे अस्वलांची संख्या हे या परिसराचे जंगल वैभव आहे, असे आम्ही मानतो. 
- प्रशांत तेंडुलकर,
वन्यअधिकारी, दाजीपूर

Web Title: Bear found in Dajipur Wildlife Sanctuary