जेवणाच्या ताटात माती गेली, जवानास बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

शिक्षक कॉलनीतील एका जुन्या बांधकामाजवळ काल दुपारी जेवण करताना मच्छिंद्र बडे व वरील चार आरोपींमध्ये किरकोळ वाद झाला.

पाथर्डी : जेवणाच्या ताटात माती गेल्याच्या रागातून माळी बाभूळगाव शिवारातील शिक्षक कॉलनीत काल (ता. 22) दुपारी चौघांनी जवानास मारहाण केली. दरम्यान, सोशल मीडियावर गोळीबार झाल्याची अफवा पसरल्याने पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. 

या बाबत केंद्रीय राखीव दलातील जवान मच्छिंद्र चंद्रकांत बडे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी केतन जाधव, राम जाधव, गौरव पैठणकर व सागर पैठणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील, पोलिस उपअधीक्षक मंदार जावळे, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी आदींसह दंगल नियंत्रक पथक, श्वानपथक, ठसेतज्ज्ञ असा सुमारे शंभर जणांचा फौजफाटा काल (बुधवारी) रात्री सात वाजेपासून आज पहाटे पाच वाजेपर्यंत राबत होता. अखेर पहाटे याबाबत गुन्हा दाखल झाला. 

हेही वाचा - राम शिंदे यांची उडाली झोप

जम्मू-काश्‍मीर येथे सीआरपीएफच्या 177 बटालियनमध्ये मच्छिंद्र बडे कार्यरत आहेत. मार्चमध्ये ते महिनाभराच्या सुटीवर गावी आले होते. सुटी संपली, मात्र लॉकडाउनमुळे ते येथेच अडकून पडले. 
दरम्यान, शिक्षक कॉलनीतील एका जुन्या बांधकामाजवळ काल दुपारी जेवण करताना मच्छिंद्र बडे व वरील चार आरोपींमध्ये किरकोळ वाद झाला.

बडे यांच्यामुळे आरोपी राम जाधव यांच्या ताटात माती गेली. त्या रागातून वरील आरोपींनी बडे यांना मारहाण केली. अक्षय जायभाये याने भांडण सोडविल्यावर सगळे घरी गेले. त्यानंतर सायंकाळी पुन्हा वरील चौघांनी बडे यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर चौघेही पसार झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beating of a soldier in Pathardi