चाँदबीबी महाल बनला प्रेमीयुगुलांचा ‘निवारा’!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016


कुटुंबाबरोबर आणि मित्रासोबत गेल्या पाच-सहा वर्षांपासून मी महालावर फिरायला जातो. महालावर ठिकठिकाणी बसलेली जोडपी पाहून आम्हालाच आमचा रस्ता बदलावा लागतो. आम्ही त्यांचे समुपदेशन करण्याचाही प्रयत्न केला; पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
- मनीष भंडारी, बांधकाम व्यावसायिक

मेहेकरी - सध्या परिसरात दमदार पाऊस झाल्याने निसर्गाने हिरवी शाल पांघरली आहे. मुळात मेहेकरी परिसर डोंगरी असल्याने निसर्गाने मुक्त हस्ताने दान दिलेले आहे. त्यात चाँदबीबी महालाची भर. त्यामुळे पर्यटकांची पावले आपोआपच इकडे वळतात. सुटीचा दिवस किंवा दर रविवारी ही गर्दी वाढलेली असते. मात्र, जगाचे भान नसलेले अनेक प्रेमीयुगुल येथे बसलेले असतात. विशेष म्हणजे, त्यातील अनेक मुली अल्पवयीन असल्याचे दिसते.

नागरिकांनी त्यांना समजावून सांगितल्यास काही तेथून उठतात, नि लगेच दुसरीकडे जाऊन बसतात. अगदी शाळेच्या गणवेशात येथे आलेले असतात. अगोदर तोंडाला स्कार्फ बांधून मुली येथे येत होत्या. मात्र, आता दोन मुली एका दुचाकीवर आणि मुले दुसऱ्या दुचाकीवर येथे येतात. सकाळीच या शाळकरी मुली आल्याचे पाहून चौकशी केली असता, खासगी क्‍लासला दांडी मारून ही मुले-मुली महालावर आली होती.

प्रत्येक वेळी पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी जनभावना आणि प्रतिक्रिया उमटत असते; पण प्रत्येक जबाबदारी पोलिस खात्यावर ढकलण्यापेक्षा सुज्ञ पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवणेही गरजेचे आहे. ज्या खासगी क्‍लासमध्ये हे विद्यार्थी जातात, त्यांनी विद्यार्थ्यांची गैरहजेरी पालकांना कळविणे, गरजेचे आहे.
 

Web Title: Became camdabibi house love birds 'shelter'!