
Bedane Price : द्राक्षांपाठोपाठ बेदाणा दरातही घसरण
तासगाव : द्राक्ष ३० रुपये किलोने विकली जात असताना आता बेदाणा दरातही पडझड होऊ लागली आहे. बेदाण्याला सरासरी १३५ ते १६० रुपये दर मिळू लागल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता आणखी वाढल्या आहेत.
गेल्या महिन्यात द्राक्ष दर कोसळत असताना नव्या बेदाण्याचे बाजारपेठेत आगमन झाल्यानंतर मुहुर्ताच्या सौद्यांमध्ये दर २८० वर पोहोचले होते. त्यामुळे द्राक्षाला नाही, मग बेदाण्याला तर दर चांगले मिळतील, अशा अपेक्षा वाढल्या होत्या.
मात्र जसजशी बाजारपेठेत बेदाण्याची आवक वाढू लागली, तसतसे त्याचे दरही कोसळू लागले आहेत. काल झालेल्या सौद्यामध्ये हिरवा बेदाणा १३५ ते २५५, पिवळा बेदाण्याला १२५ ते १९१ रुपये किलो दर मिळाला. सरासरी दर १३५ ते अधिकाधिक १५० रुपये मिळताना दिसत आहे.
एखाद्याच शेतकऱ्याच्या बेदाण्याला दोनशे रुपयांच्या पुढे दर मिळतो आहे. चांगल्या प्रकारच्या बेदाण्याला चांगले दर मिळत असल्याचे चित्र आहे. मात्र असा बेदाणा किती? सध्या बाजारपेठेत नव्या बेदाण्याची मोठी आवक सुरू झाली आहे.
काल झालेल्या सौद्यात १६०० टन नवा बेदाणा विक्रीसाठी आला होता. प्रत्येक सौद्यात बेदाण्याची आवकही वाढताना दिसत आहे. त्यातच यंदा बेदाण्याचे उत्पादन विक्रमी पद्धतीने वाढण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक हादरले आहेत.
गतवर्षी राज्यात आणि विजापूर परिसरात मिळून २२ हजार गाड्या बेदाणा उत्पादन झाले होते. यंदा त्यात वाढ होऊन २५ ते २७ हजार गाड्या बेदाणा होण्याची शक्यता आहे. त्याचाही परिणाम बेदाणा दरावर होणार हे नक्की आहे, तसे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत.
शीतगृहात ठेवल्यास खर्च वाढणार
सध्या ८५ ते ९० रुपये चार किलो दराने बेदाण्यासाठी बागा खरेदी सुरू आहे. बेदाणा बनविण्यासाठी एक किलोसाठी ३५ रुपये खर्च येतो आहे. याशिवाय हा बेदाणा शीतगृहात ठेवल्यास त्याचा खर्च वेगळा. या पार्श्वभूमीवर बेदाण्याला सध्या मिळणारा दर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या चिंता वाढविणारा आहे.