esakal | बेळगाव : फक्त पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

ganpati

बेळगाव : फक्त पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : कर्नाटक सरकारकडून फक्त पाच दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी देण्याच्या निर्णयाला शहरातील गणेश भक्तातून तीव्र विरोध होत असून परंपरेप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाईल. अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच सरकारच्या निर्णयामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व प्रशासनामध्ये वाद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

बेळगाव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाला शंभराहून अधिक वर्षांची परंपरा आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1905 मध्ये शहरात येऊन गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती तेव्हापासून आतापर्यंत शहरातील मंडळांनी गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत उत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. तसेच गेल्या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत 11 दिवस उत्सव साजरा करण्यात आला होता.

हेही वाचा: वाटीवर वाटी, वाटीत रवा... कोरोनाले घेऊन जाय महादेवा !

त्याचप्रमाणे यावेळीही उत्सव साजरा केला जाईल असे आश्वासन मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे प्रशासनास देण्यात आले होते तसेच लहान मंडप घालण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी करण्यात आली होती मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करीत शहरी भागातील प्रत्येक वॉर्डात एकाच ठिकाणी उत्सव साजरा करावा, ग्रामीण भागात प्रत्येक गावात एकच मंडप घालावा अशा प्रकारचे विविध नियम गणेशोत्सवासाठी घालण्यात आले आहेत. मात्र सरकारने नवीन नियम लागू केल्याची माहिती मिळताच गणेश भक्तांतून तीव्र संताप व्यक्त केला जात असून परंपरेमध्ये खंड पडू दिला जाणार नाही असा निर्धार कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. तसेच मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मंडळाची भूमिका मांडली जाणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा: 'त्या' घटनेनंतर ५ लाख शिखांनी अफगाणिस्तान सोडले होते...

सरकारने घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा असून हिंदुत्वाच्या नावावर निवडून येणाऱ्या सरकार कडून अशी अपेक्षा नव्हती. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे परंपरेप्रमाणे गणेश उत्सव साजरा करतील. निवडणूक घेताना प्रशासनाला कोरोना दिसला नाही मात्र गणेशोत्सव काळात कोरोना वाढेल असे सांगणे चुकीचे आहे. याबाबत प्रशासनाची चर्चा करण्यात येणार आहे.

- रमाकांत कोंडुसकर, कार्याध्यक्ष मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ

गेल्या वर्षीप्रमाणेच लहान मंडप घालून गणेश उत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी महामंडळाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली होती. याबाबत विचार न करता फक्त पाच दिवसांचा उत्सव करा असे सांगणे चुकीचे असून याबाबत शहरातील मंडळाची भूमिका प्रशासनासमोर मांडण्यात येईल. परंपरेमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये याची दक्षता महामंडळाकडून घेतली जाईल.

- रणजित चव्हाण पाटील, अध्यक्ष मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ

शहरात मराठमोळ्या वातावरणात सार्वजनिक गणेश उत्सव साजरा होत असतो तसेच पुणे-मुंबई नंतर या भागातील उत्सव सर्वात मोठा असतो. याची माहिती सरकारला असून देखील पाच दिवसाचा उत्सव साजरा करणे सूचना करणे म्हणजे मराठी भाषिकांवर अन्याय आहे. परंपरेप्रमाणे मराठी भाषिक आपला उत्सव साजरा करतील

- सागर पाटील, कार्यकर्ता

loading image
go to top