Belgaon: ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या

बेळगाव : ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या

sakal_logo
By
सतीश जाधव

बेळगाव : बेळगाव तालुक्यात गेल्या महिनाभरापासून सुगी हंगामाला सुरुवात झाली आहे. सद्या भात कापणी, मळणी, रताळी काढणे व ऊस तोडणी सुरु आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह अधून मधून पावसाच्या सरी बरसत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. यामुळे काही ठिकाणी शेतीची कामे ठप्प तर काही ठिकाणी संथगतीने सुरु आहेत. ढगाळ वातावरण असेपर्यंत अशीच स्थिती राहणार आहे. पाऊस झाल्यास हाता-तोंडाला आलेली पिके खराब होण्याचा धोका शेतकऱ्यांना आहे.

बेळगाव तालुक्यात भातासह, बटाटे, भुईमुग व अन्य पिके घेतली जातात. मात्र मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे. तालुक्यात भात पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यामुळे अनेकांचे भात पिक कापणीला आले आहे. मात्र, ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी भात कापणीला उशीर करत आहेत. मात्र, उशीर झाल्यास पुन्हा भात खाली झडण्याचा धोकाही आहे. यामुळे भात कापले तर पावसाचे संकट तसेच न कापले तर झडण्याचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे.

हेही वाचा: पुणे : मुख्याध्यापकांचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवारपासून

अनेक शेतकऱ्यांनी ऐन दिवाळीच्या दरम्यान भात कापणी केली होती. मात्र, दिवाळीतच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. यामुळे पुन्हा जोरदार पाऊस पडेल अशी भिती शेतकऱ्यांना आहे. यामुळे अनेकांनी भात कापणी पुढे ढकलली आहे. बटाटे व भुईमुग शेंगा वेळेत काढणे गरजेचे आहे. मात्र, पावसामुळे बटाटे व भुईमुग शेंगा देखील जमिनीतच खराब होण्याचा धोका आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून ऊस तोडणी केली जात आहे. मात्र, ढगाळ वातावरण व पावसाच्या भितीमुळे अनेकांनी ऊस तोडणी करणेही थांबविले आहे. वातावरणातील बदलाकडे सर्व शेतकऱ्यांच्या नजरा आहेत.

loading image
go to top