esakal | कर्नाटकात चार मंत्र्यांच्या नावाची जोरदार चर्चा ; पालकमंत्रिपदी कोणत्‍या नेत्‍याची लागणार वर्णी?

बोलून बातमी शोधा

Belgaum District Guardian Minister post vacant gossiping in karnataka political marathi news}

 

 अश्‍लिल सीडी प्रकरणामुळे  रमेश जारकीहोळी  मंत्रिपदाचा राजीनामा दिला अन्

paschim-maharashtra
कर्नाटकात चार मंत्र्यांच्या नावाची जोरदार चर्चा ; पालकमंत्रिपदी कोणत्‍या नेत्‍याची लागणार वर्णी?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : अश्‍लिल सीडी प्रकरणी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. यामुळे बेळगाव जिल्हा पालकमंत्रिपद रिक्त झाले आहे. यामुळे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी लावणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

यापूर्वी जगदीश शेट्टर यांच्यावर बेळगाव जिल्हा पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, शेट्टर यांनी जिल्ह्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा तसेच ते जिल्ह्यासाठी कमी वेळ देत असल्याची तक्रार भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. यानंतर पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांना पालकमंत्री करण्यात आले. मात्र, अश्‍लिल सीडी प्रकरणामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे बेळगाव जिल्हा पालकमंत्रिपदी विराजमान होण्यासाठी जिल्ह्यातील मंत्र्यांनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मंत्री कत्ती हे अनुभवी तसेच ज्येष्ठ असल्याने पालकमंत्रिपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडण्याची शक्‍यता अधिक असल्याची चर्चा सुरु आहे. 

आठ वेळा आमदार, विविध खात्याचे मंत्री आणि एकदा बेळगावचे पालकमंत्री म्हणून कत्ती यांनी जबाबदारी सांभाळली आहे. यामुळे पालकमंत्रिपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर आहे. दरम्यान, सवदी यांना उपमुख्यमंत्रिपद दिल्याने त्यांना पालकमंत्रिपद देण्याची शक्‍यता कमी असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु असताना रमेश जारकीहोळी यांचे बंधू अरभावीचे आमदार, कर्नाटक दूध उत्पादन संघाचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांना पालकमंत्री करावे, अशी मागणीही होत आहे. यामुळे मंत्रिपद गमावलेल्या जारकीहोळी कुटुंबियांच्या पाठीशी पक्ष असल्याचा संदेश देण्याचे प्रयत्न होण्याचीही शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

पालकमंत्रिपद औटघटकेचेच?
आपल्यावरील आरोप सिध्द न झाल्यास पुन्हा मंत्रिपद देण्यात यावे, अशी अट रमेश जारकीहोळी यांनी राजीनामा देतेवेळी घातली असल्याचे बोलले जात आहे. यामुळे दुसऱ्या नेत्याला पालकमंत्रिपद जरी मिळाले तरी ते औटघटकेचे ठरण्याची शक्‍यता आहे. यामुळे जिल्ह्यातील पुढील राजकीय घडामोडींबाबत कुतुहल निर्माण झाले आहे.

संपादन- अर्चना बनगे