esakal | बेळगाव: श्रीमंत पाटलांच्या वक्तव्याची चौकशी करा
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगाव: श्रीमंत पाटलांच्या वक्तव्याची चौकशी करा

बेळगाव: श्रीमंत पाटलांच्या वक्तव्याची चौकशी करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव: माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी भाजप प्रवेशासाठी पैशाची ऑफर दिल्याबाबत केलेले वक्तव्य शंभर टक्के बरोबर आहे. या वक्तव्याची बंगळूर किंवा बेळगावमधील एसीबी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली. बेळगाव महापालिका निवडणुकीविरोधात पराभूत उमेदवार न्यायालयामध्ये धाव घेणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचेही उमेदवार असतील तर त्याला आक्षेप घेणार नाही, असा खुलासाही त्यांनी केला.

हेही वाचा: सांगली: दुबईतील कंपनीचा व्यापाऱ्याला १ कोटी ३६ लाख रुपयांचा गंडा

काँग्रेस कार्यालयात रविवारी (ता. ११) झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. शिवकुमार बोलत होते. स्वच्छ प्रशासनाबाबत भाजप बोलते, पण त्यांचे पितळ उघड पडले आहे. ऑपरेशन कमळद्वारे आमिष दाखवत भाजपात ओढून घेतल्याचे श्रीमंत पाटील यांनी सांगून पडद्यामागे चालणाऱ्या गैरप्रकारावर प्रकाश टाकला आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. निःपक्ष चौकशीसाठी एसीबीने पुढे यावे, असे आवाहनही शिवकुमार यांनी केले.

बेळगाव महापालिका निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, या निवडणुकीवेळी निवडणूक विभागाचा सावळागोंधळ दिसला. काँग्रेसला एक आणि भाजपला दुसरी मतदारयादी मिळाली. मतदार यादीतील गोंधळाचा लाभ भाजपला झाल्याची टीकाही श्री. शिवकुमार यांनी केली. एआयसीसीने याची दखल घेतली असून सत्यशोध समिती स्थापली आहे. निवडणूक पारदर्शी झाली नसल्याने काँग्रेसचा पराभव झाला.

या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीवरही अन्याय झाला आहे, असे सांगून शिवकुमार यांनी केंद्र सरकार अपयशी ठरल्यामुळेच बी. एस. येडियुरप्पा यांचा राजीनामा घेण्यात आल्याचा आरोप केला. यावेळी केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी, ध्रुव नारायण, आमदार गणेश हुक्केरी, महांतेश कौजलगी, माजी आमदार अशोक पट्टण, माजी आमदार फिरोज सेठ, ए. बी. पाटील, लक्ष्मण चिंगळे, विनय नावलगट्टी, राजू सेठ उपस्थित होते.

महागाईविरोधात बैलगाडी मोर्चा

येत्या २ ऑक्टोबरपासून काँग्रेस प्रत्येक गावात महात्मा गांधी ग्रामस्वराज्य सभा घेणार आहे. याद्वारे ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्याला वाचा फोडणार आहे. सध्या महागाई गगनाला भिडली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरसह जीवनावश्‍यक वस्तूंचे दर वाढत आहेत. त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी काँग्रेसतर्फे बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार असून याकडे सरकारचे लक्ष वेधणार असल्याची माहितीही डी. के. शिवकुमार यांनी दिली.

loading image
go to top