काढायला गेला कर्ज अन् मिळाली मदत 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

गर्लगुंजीतील राहुल बिदरभावीकर किडनीच्या विकाराने त्रस्त आहे

खानापूर : क्षुल्लक कारणातून मित्रानेच मित्राचा काटा काढल्याच्या बातम्या रोज ऐकायला मिळतात. अशा काळात एका मित्राने सुखद धक्का दिल्याची घटना खानापुरात घडली. लॉकडाउनमध्ये स्वत:ची नोकरी गेलेली असतानाही मित्राला उपचारासाठी आर्थिक मदत करण्याच्या हेतूने तो कर्ज काढायला पतसंस्थेत गेला. मात्र, त्यामागचे कारण समजताच पतसंस्थेने कर्ज देण्याऐवजी मित्राला दहा हजारांची मदत देऊ केली. 

त्याचे असे झाले, गर्लगुंजीतील राहुल बिदरभावीकर किडनीच्या विकाराने त्रस्त आहे. त्याच्यावरील उपचारासाठी लाखोंचा खर्च अपेक्षित आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने ग्रामस्थांनी वर्गणी काढून आतापर्यंत उपचाराचा खर्च भागविला आहे.

सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करणारे वृत्त वाचून उद्यमबागमधील कारखान्यात काम करणाऱ्या ज्ञानेश्वर बेडरेला (रा. रुमेवाडी) धक्काच बसला. मित्र संकटात असल्याची माहिती मिळताच थेट रुमेवाडीतील महालक्ष्मी पतसंस्थेत जाऊन त्याने पाच हजार रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला. केवळ पाच हजारांच्या कर्जासाठी अर्ज आल्याने संस्थेचे सचिव लक्ष्मण पाटील चाट पडले. त्यांनी कर्जाचे कारण विचारता ज्ञानेश्वरने कैफियत मांडली. श्री. पाटील यांनी तत्काळ संचालक मंडळाशी बोलून संस्थेकडून त्याला कर्जाऐवजी दहा हजारांची मदत दिली. शिवाय लक्ष्मण पाटील यांनी त्यांच्यातील मैत्रीबंध पाहून स्वत: अडीच हजार रुपये दिले. 

लॉकडाउननंतर अनेकांच्या हातचा रोजगार गेला. ज्ञानेश्वरचीही तिच गत झाली. पण, मित्र संकटात असल्याने राहवले नाही. एकाच कारखान्यात काम करताना एकत्र घालवलेले क्षण, वाटून खाल्लेले जेवण, एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी झालेले ते प्रसंग त्याला अस्वस्थ करुन गेले. कर्ज कधी तरी फेडू, पण मित्रावर उपचार झाले पाहिजेत, या भावनेने तो पतसंस्थेत गेला. चांगल्या कामाची कदर होतेच. त्यानुसार त्याच्या या कृतज्ञतेची दखल महालक्ष्मी पतसंस्थेने घेतली. 

हे पण वाचा जिवलग मित्र धनंजय मुंडेंवर होणाऱ्या बलात्काराच्या आरोपावर अमोल कोल्हेंनी केलं मोठं वक्तव्य 

 

मैत्री, माणुसकीचे दर्शन 
ज्ञानेश्वरने मैत्र जपले, महालक्ष्मी पतसंस्थेने व्यवसाय न बघता माणुसकी बघून मदतीचा हात पुढे केला. दरवर्षी ठेवी आणि नफ्याचे आकडे फुगविणाऱ्या मोठ्या संस्थांना छोट्याशा संस्थेने एक धडा दिलाच. शिवाय ज्ञानेश्वरनेही मैत्री कशी नि:स्वार्थ असावी, याचा वस्तुपाठच घालून दिला. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: belgaum loan friend help friend