Belgaum News: ओबीसी आरक्षणाचा तिढा, बेळगावच्या नगरसेवकांनाही उत्सुकता

विजापूर, गुलबर्गा महापौर निवड होणार का?
Belgaum Municipal Corporation
Belgaum Municipal Corporationsakal

बेळगाव : ओबीसी आरक्षणाची समस्या कायम असताना बेळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक घेण्याची तयारी प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी दाखविली आहे.

ओबीसी आरक्षणामुळे बेळगाव, विजापूर व गुलबर्गा या तीन महापालिकांची महापौर निवडणूक रखडली आहे, पण यापैकी केवळ बेळगावचीच महापौर निवडणूक कशी होणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

बेळगाव प्रादेशिक आयुक्तांच्या कार्यकक्षेत तीन महापालिका येतात. त्यापैकी हुबळी-धारवाड महापालिकेची निवडणूक झाली आहे. महापौर व उपमहापौरपदाचे आरक्षण ओबीसीसाठी राखीव नसल्यामुळे तेथील महापौर निवडणूक घेता आली.

बेळगाव व विजापूर महापालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाची समस्या असल्यामुळे येथील निवडणूक झाली नाही.

नगरविकास खात्याकडून महापौर निवडणूक घेण्याचा आदेश देण्यात आला असेल तर तो बेळगाव व विजापूर या दोन्ही महापालिकांसाठी लागू व्हायला हवा, पण प्रादेशिक आयुक्तांना पाठविण्यात आलेल्या पत्रात केवळ बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा व महापौर-उपमहापौरपदाच्या आरक्षणाचा संदर्भ देण्यात आला आहे.

त्यामुळे विजापूरची महापौर निवडणूक होणार नाही का? तेथे ओबीसी आरक्षणाची समस्या कायम आहे का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

बेळगाव, हुबळी-धारवाड व गुलबर्गा महापालिकांची निवडणूक सप्टेंबर २०२१ मध्ये झाली. या महापालिकांच्या महापौर व उपमहापौर आरक्षणाबाबत स्पष्टीकरण देण्यास नगरविकास खात्याने विलंब लावला.

२५ जानेवारी २०२२ रोजी आरक्षणाबाबत स्पष्टीकरण दिल्यामुळे हुबळी-धारवाडची निवडणूक झाली, पण ओबीसी आरक्षणामुळे बेळगाव व गुलबर्गा महापौर निवडणूक झाली नाही.

सप्टेंबर २०२२ मध्ये विजापूर महापालिकेची निवडणूक झाली. तेथेही ओबीसी आरक्षणाची समस्या असल्यामुळे अद्याप निवडणूक झालेली नाही.

बेळगावची महापौर निवडणूक होत असेल तर मग विजापूर व गुलबर्गाची निवडणूकही व्हायला हवी. याबाबत नगरविकास खाते व बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांकडूनच खुलासा व्हायला हवा.

ओबीसी आरक्षणाला स्थगिती असल्यामुळे राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबल्या आहेत. ओबीसी आरक्षणाबाबतची माहिती सादर करण्यास न्यायालयाने राज्य शासनाला ३१ मार्चची मुदत दिली आहे.

ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न न्यायप्रविष्ट असताना बेळगावची महापौर निवडणूक होणार का, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागून राहिले आहे.

सूचनेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित

गुलबर्ग्याचे प्रादेशिक आयुक्त वेगळे असल्यामुळे नगरविकास खात्याकडून गुलबर्गा प्रादेशिक आयुक्तांना सूचना मिळाल्यावरच तेथील निवडणूक होणार आहे.

मात्र, बेळगावची महापौर निवडणूक घेण्याची सूचना नगरविकास खात्याने बेळगाव प्रादेशिक आयुक्तांना केली असेल, तर मग गुलबर्गा प्रादेशिक आयुक्तांना का केलेली नाही, असा प्रश्‍नही उपस्थित झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com