निपाणीतील अपघातात कागल तालुक्‍यातील दोन ठार 

राजेंद्र हजारे
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

निपाणी - खडकलाट येथून गोकूळ शिरगावकडे जाणारी मोटार आणि निपाणीहून नाईंग्लजकडे जाणाऱ्या ट्रॅक्‍टर-ट्रॉली यांच्यात अपघात झाला. यात कागल तालुक्‍यातील दोघेजण ठार झाले.

निपाणी - खडकलाट येथून गोकूळ शिरगावकडे जाणारी मोटार आणि निपाणीहून नाईंग्लजकडे जाणाऱ्या ट्रॅक्‍टर-ट्रॉली यांच्यात अपघात झाला. यात कागल तालुक्‍यातील दोघेजण ठार झाले.

आज (मंगळवार)  सायंकाळी चारच्या सुमारास निपाणी-चिक्कोडी रोडवरील जनावरांच्या बाजाराजवळ ही घटना घडली. दत्ता उर्फ संभाजी आत्माराम आवटे (वय 30, रा. पिंपळगाव खुर्द) व संग्राम धनाजी नागराळे (वय 20, रा. शाहूनगर, कागल) अशी मृतांची नावे आहेत. 

याबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दत्ता आवटे यांचे खताचे दुकान गोकूळ शिरगाव येथे आहे. त्यांनी खडकलाट येथून खत आणण्यासाठी धनाजी नागराळे यांचा ट्रक भाड्याने घेतला होता. त्यानुसार धनाजी व त्यांचा मुलगा संग्राम हे दोघेही दुपारी तीनच्या सुमारास खडकलाट येथे पोहोचले. त्याचवेळी दत्ता आवटे हे आपली मोटार (एमएच 14 ई 7538) घेऊन खडकलाट येथे गेले. पण कारखान्याजवळ खत भरण्यासाठी वेळ असल्याने दत्ता आवटे संबंधित कारखान्यास खताची माहिती देऊन ते मोटारीने गोकूळ शिरगावकडे निघाले. जाताना त्यांनी सोबत धनाजी नागराळे यांचा मुलगा संग्राम बरोबर घेतले. 

निपाणीजवळील जनावरांच्या बाजाराजवळ आल्यानंतर निपाणीहून नाईंग्लजकडे जाणाऱ्या ट्रॅक्‍टर-ट्रॉली (केए 28 टी 6680) व मोटार यांच्यात समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये संग्राम नागराळे व दत्ता आवटे यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन दोघांनाही रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण ते जागीच गतप्राण झाल्याने त्यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघातानंतर ट्रॅक्‍टर चालक शिवलिंग सत्याप्पा खोत (रा. नाईंग्लज) हा स्वतःहून पोलिसात हजर झाला आहे. मंडल पोलिस निरीक्षक किशोर भरणी, बसवेश्‍वर चौक पोलिस ठाण्याचे फौजदार बसवराज बेटगिरी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. 

अपघाताची माहिती मिळताच कागल व पिंपळगाव खुर्द येथील नातेवाईकांनी गांधी रुग्णालयाच्या आवारात मोठा आक्रोश केला. मृत संग्राम नागराळे याच्या वडिलांनी हंबरडा फोडला. यावेळी धनाजी नागराळे अस्वस्थ झाल्याने त्यांना गांधी रुग्णालयात उपचार करून आपल्या कागल येथे पाठविण्यात आले. तसेच नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. 

Web Title: Belgaum News Accident in nipani two dead