बेळगाव : विरोधी गटनेतेपदी दीपक जमखंडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

विरोधी गटाकडून महापौर व उपमहापौर पदासाठी प्रत्येकी दोन उमेदवार उभे करण्यात आले होते. या गटबाजीच्या राजकारणात माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनीही उघडपणे सहभाग घेतला होता. गटनेता बदलण्याची धोत्रे यांची खेळी त्यांच्यावरच उलटविण्यात आली आहे

बेळगाव : महापालिकेची सर्वसाधारण बैठक सुरू असतानाच घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर विरोधी गटनेतेपदी दीपक जमखंडी यांची निवड करण्यात आली. रवी धोत्रे यांची या विरोधी गटनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली. विरोधी गटातील 26 पैकी 16 नगरसेवकानी पाठींबा दिला आहे. 16 नगरसेवकांच्या पाठींब्याचे पत्र बैठक सुरू असतानाच महापौर संज्योत बांदेकर यांच्याकडे देण्यात आले. महापौरानी हे पत्र तातडीने स्विकारले व जमखंडी यांची विरोधी गटनेतेपदी निवड करण्यात आल्याचे जाहीर केले.

महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत विरोधी गटनेत्यांची निवड होण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडला. या घडामोडींमुळे विरोधी गटातील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली. विशेष म्हणजे या सर्व घडामोडी आमदार फिरोज सेठ यांच्या कक्षात घडल्या. यावेळी माजी मंत्री सतीश जारकीहोळी उपस्थित होते. जारकीहोळी व सेठ यांनी एकत्र येवून धोत्रे यांना विरोधी गटनेतेपदावरून हटविले. पालकमंत्री रमेश जारकीहोळी व माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यातील संघर्ष संपूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहे. त्याचे पडसाद आता महापालिकेतही ऊमटले आहेत. रवी धोत्रे हे रमेश जारकीहोळी  व लखन जारकीहोळी समर्थक आहेत.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात रवी धोत्रे यानी तात्कालीन विरोधी गटनेते पिंटू सिद्दीकी यांना धोबीपछाड देत गटनेतेपद मिळविले होते. त्यावेळी 22 नगरसेवकांनी धोत्रे यांना पाठिंबा दिला होता. तात्कालीन महापौर सरीता पाटील यांनी धोत्रे यांची गटनेतेपदी निवड केली होती. त्यानंतर विरोधी गटात उभी फूट पडली होती. धोत्रे यांच्या निवडीमुळे आमदार सेठ यांना मोठा धक्का बसला होता. महापौर निवडणूकीतही या गटबाजीचे पडसाद उमटले होते.

विरोधी गटाकडून महापौर व उपमहापौर पदासाठी प्रत्येकी दोन उमेदवार उभे करण्यात आले होते. या गटबाजीच्या राजकारणात माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनीही उघडपणे सहभाग घेतला होता. गटनेता बदलण्याची धोत्रे यांची खेळी त्यांच्यावरच उलटविण्यात आली आहे. विशेष म्हणजे आमदार सेठ व माजी मंत्री जारकीहोळी यांनीच 16 विरोधी नगरसेवकांना एकत्र आणून ही खेळी केली आहे. यासाठी पहिल्यांदाच सतीश जारकीहोळी महापालिकेच्या बैठकीच्या कामकाजात सहभागी झाले. जमखंडी यांच्या निवडीचा सर्वाधिक आनंद सत्ताधारी गटाला झाला. माजी महापौर सरीता पाटील सभागृहात जमखंडी यांचे अभिनंदन केले. विरोधी गटाच्या सभागृहात उपस्थित नगरसेवकांपैकी कोणीही जमखंडी यांचे अभिनंदन केले नाही हे विशेष. रवी धोत्रे यानी मात्र हे सर्व आपल्या विरोधात रचलेले षडयंत्र असल्याचे सांगितले. नगरसेवकांना अंधारात ठेवून पाठींब्याच्या पत्रावर सह्या घेण्यात आल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री रमेश जारकीहोळी दिल्ली येथे आहेत. ते परत आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनाला आणून दिला जाईल असेही त्यानी सांगितले.

Web Title: belgaum news: deepak jamkhandi elected as opposition leader