केडीसीसी बॅंकेचे चार कोटी रुपये जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

बेळगाव - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (केडीसीसी) चार कोटी रुपये गुरुवारी (ता. १२) दुपारी ४ वाजता बुगटे आलूर (ता. हुक्केरी) चेकपोस्टवर जप्त करण्यात आले. केडीसीसीच्या संचालक व अधिकाऱ्यांनी तातडीने चेकपोस्टवर जाऊन रक्‍कम परत देण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत रक्‍कम परत मिळाली नव्हती. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, केडीसीसीच्या गडहिंग्लज शाखेचे कर्मचारी पैसे आणण्यासाठी कोल्हापूरच्या मुख्य शाखेत गेले होते. गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तीन तालुक्‍यांतील बटवड्यासाठी ही रक्‍कम कोल्हापूरच्या मुख्य शाखेतून गडहिंग्लजला नेण्यात येत होती. चार कोटी रुपये घेऊन गडहिंग्लजला परत येताना बुगटे आलूर चेकपोस्टवर अधिकाऱ्यांनी ते जप्त केले. कर्मचाऱ्यांनी या संदर्भात माहिती मुख्य शाखेला दिली. त्यावर मुख्य शाखेतील कोषागार श्री. जाधव, बॅंकेचे संचालक संतोष पाटील, विकास अधिकारी रणनवरे, निरीक्षक वाळके तातडीने बुगटे आलूरला गेले. त्यांनी ४ कोटी रुपयांसंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर केली.

प्राप्तिकर खात्याचे अधिकारीही तिथे आले. त्यांनीही त्या पैशासंदर्भात सविस्तर चौकशी केली. चेकपोस्टवरील अधिकारी तसेच प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी केडीसीसीच्या मुख्य शाखेशी संपर्क साधून पैसे बटवड्यासाठी नेले जात असल्याची खात्री करून घेतली. तरीही अधिकाऱ्यांनी पैसे परत दिले नाहीत. संचालक श्री. पाटील व बॅंकेचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत तेथे थांबून अधिकाऱ्यांशी चर्चा करीत होते; पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. चेकपोस्टवरील अधिकाऱ्यांच्या ताठर व असहकार्याच्या भूमिकेबद्दल केडीसीसीच्या अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum News KDCC four crore of bank seized