बेळगावात रात्रीत चौदा मोटारींमधील साऊंड सिस्टमची चोरी

संजय सूर्यवंशी
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

बेळगाव -  माळमारुती परिसरातील 14 मोटारींमधील 3 लाख 36 हजार रुपये किमतीचे  साऊंड सिस्टम चोरीला गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. अन्य 4 मोटारींमध्येही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये काही सापडले नाही. या सर्व मोटारींच्या काचा फोडल्याने मालकांचे मोठे नुकसान झाले आहे.  याप्रकरणी माळमारुती पोलिसात नोंद झाली आहे.

बेळगाव -  माळमारुती परिसरातील 14 मोटारींमधील 3 लाख 36 हजार रुपये किमतीचे  साऊंड सिस्टम चोरीला गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. अन्य 4 मोटारींमध्येही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये काही सापडले नाही. या सर्व मोटारींच्या काचा फोडल्याने मालकांचे मोठे नुकसान झाले आहे.  याप्रकरणी माळमारुती पोलिसात नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रात्री घरासमोर लावलेल्या अठरा मोटारींच्या काचा चोरट्यांनी फोडल्या आहेत. यापैकी चौदा मोटारीतील साऊंड सिस्टम चोरला आहे. उर्वरित चार मोटारींच्या  काचा  फोडल्या आहेत.  यामध्ये साऊंड सिस्टम शोधण्याचा  प्रयत्न केला.  परंतु  त्यांच्या हाती काहीही लागले नाही. म्हणून चोरट्यांनी एका मोटारीतील किचनमध्ये  वापरण्याचे  साहित्य चोरून नेले आहे. चोरट्यांनी  फोडलेल्या  वाहनांमध्ये 9 स्विफ्ट, दोन  इनोव्हा व प्रत्येकी एक रिट्झ, ब्रेंझा, आय-20,  शेव्हरोलेट  व स्कोडा मोटारीचा समावेश आहे.

याप्रकरणी डॉक्टर सुभाष  इरेशगौडा पाटील (रा. वंटमुरी कॉलनी) यांनी माळमारुती पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या मोटारीतील सोनी कंपनीचा 55 हजार रुपये किंमतीचा साऊंड सिस्टम चोरील गेला आहे. तसे श्री पाटील यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

एकच टोळी असल्याचा संशय

या सर्व चोऱ्यांमध्ये काचा फोडीच्या घटनेत साम्य दिसून येते. बहुतांशी गाड्यांची समोरील  व बाजूच्या काचा फोडलेल्या दिसून येतात. त्यामुळे हे कृत्य एकाच टोळीने केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यापूर्वीही वंटमुरी परिसरातून काही मोटारींमधील  साऊंड सिस्टम चोरीला गेले आहेत. परंतु, शुक्रवारी रात्री साडेअकरा ते आज पहाटे साडेचार या काळात तब्बल 18 वाहने फोडल्याचा प्रकार उघडकीस आल्याने येथील मोटार मालकांमधून भीती व्यक्त होत आहे. एकाचवेळी इतक्या मोटारी फोडल्याने पोलिस खात्याने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. डीसीपी अमरनाथ रेड्डी, मार्केटचे एसीपी शंकर मारिहाळ, माळमारुती पोलीस ठाण्याचे निरीक्षक चन्नकेशव टिंगरेकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्री टिंगरेकर यांच्याकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

Web Title: belgaum news sound system stolen