
बेळगाव : पोलिसांचे शहरात पथसंचलन
बेळगाव: रमजान ईद, शिव व बसव जयंतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १) पोलिसांचे शहरातील प्रमुख मार्गांवरून पथसंचलन झाले. सण व उत्सवाच्या काळात कोणत्या प्रकारची अनुचित घटना घडू नये. शहराच्या शांततेला धक्का पोहचू नये यासाठी पोलिस खात्याने बंदोबस्ताची संपूर्ण तयारी केली आहे. तसेच समाजकंटकांना इशारा देण्यासाठी रविवारी पथसंचलन करण्यात आले.
चन्नम्मा चौकातून पथसंचलनाला सुरुवात झाली. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपायुक्त रवींद्र गडादी, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, खडेबाजारचे सहाय्यक पोलिस आयुक्त ए. चंद्राप्पा, मार्केटचे सहाय्यक पोलिस आयुक्त सदाशिव कट्टीमनी यांच्यासह शहरातील बहुतांशी अधिकाऱ्यांनी या पथसंचलनात सहभाग घेतला. काकतीवेस, शनिवार खूट, खंजर गल्ली, दरबार गल्ली, खडक गल्ली, भडकल गल्ली, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, चव्हाट गल्ली, जुना पीबी रोड, मार्केट पोलिस ठाण्यामार्गे खडेबाजार, टेंगिनकेरा गल्ली, भेंडीबाजार, आझाद गल्लीपर्यंत पथसंचलन करण्यात आले. नागरी पोलिसांसह राज्य राखीव दलाचे जवानही पथसंचलनात सहभागी झाले होते.
रमजान ईद, शिव व बसव जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. पोलीस ठाणेनिहाय बैठकाही घेण्यात आल्या. शांतता समिती व शिवजयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांसह हिंदू-मुस्लिम समाजातील प्रमुख नागरिकांशी चर्चा करुन सलोखा राखण्याचे आव्हान करण्यात आले आहे. रमजान, शिव व बसव जयंती सर्व सण-उत्सव एकाच वेळी आल्यामुळे पोलिसांची कसोटी लागली आहे. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Web Title: Belgaum Police Patrols City
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..