Belgaum : हिंडलग्यात २१ लाखांची घरफोडी Belgaum Retired jawan's house broken 21 lakhs in Hindalga | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Chori

Belgaum : हिंडलग्यात २१ लाखांची घरफोडी

बेळगाव : विजयनगर-हिंडलग्यामध्ये चोरट्यांनी निवृत्त जवानाचे घर फोडून २१ लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना आज (ता. ३०) उघडकीस आली आहे. चोरट्यांनी सुमारे चारशे ग्रॅम सोने आणि एक किलो चांदी पळविली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबतची माहिती अशी की, हिंडलग्यातील विजयनगर एमईएस (मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिस) कॉलनीमध्ये निवृत्त जवान राजेंद्र वामन हळदणकर यांच्या मालकीचे घर आहे. या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी किमती ऐवज लांबविला. यामध्ये सोने-चांदीच्या विविध दागिन्यांचा समावेश आहे. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर घरातील तिजोरी फोडली. तिजोरीतील सोन्यासह चांदीचे दागिने घेऊन तेथून पळ काढला.

घरमालक हळदणकर निवृत्त जवान आहेत. कामानिमित्त बुधवारी (ता. २९) ते बाहेर गेले होते. कुटुंबामधील इतर सदस्य शाळेकडे कामानिमित्त गेले होते. सकाळी साडेनऊ ते पावणे दहाच्या सुमारे सर्वजण घरामधून बाहेर पडले व दुपारी चारच्या सुमारास परतले. हळदणकर यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडण्यात आल्याचे व विविध साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे आढळले. तिजोरीची पाहणी केल्यानंतर त्याचाही लॉक मोडल्याचे दिसले.

तिजोरीतील दागिनेही चोरट्यांनी लांबिवले. त्यासाठी या संदर्भात कॅम्प पोलिसांना कल्पना दिली. यानुसार घटनास्थळी पोलिस दाखल झाले व त्यांनी पचंनामा केला. यासंदर्भात हळदणकर यांचा जबाब नोंदविला आहे. त्यामध्ये सुमारे ४०४ ग्रॅम वजनाचे विविध दागिने लंपास झाल्याची फिर्याद दिली आहे. तर १०९० ग्रॅम चांदीच्या दागिन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. यामुळे याविरोधामध्ये कॅम्प पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. कॅम्प पोलिस पुढील तपास करत आहेत.

भरदिवसा धाडसी घरफोडी

हिंडलग्यात भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. शिवाय चोरट्यांनी अचूक डाव साधल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बंद घर आणि आजूबाजूला कोणी नसल्याचे हेरून सकाळी दहा ते दुपारपर्यंत कार्यभाग उरकला आहे. भरदिवसा २१ लाखांची चोरी झाल्याने भीती निर्माण झाली आहे.