Satara : आम्ही चौघेही आमदार होणार Satara MLA Jayakumar Gore Manoj Ghorpade Darishsheel Kadam Atul Bhosale sitting next MLA Gore | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार जयकुमार गोरे

Satara : आम्ही चौघेही आमदार होणार

सातारा : सध्याच्या सरकारमधील १९ आमदारांचे निलंबन होईल, असे म्हणणारी ही मंडळी कुठल्यातरी आशेवर जगणारी असून, त्यांना आमदारांच्या अपात्रतेची काळजी आहे; पण शिंदे-फडणवीस यांचे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल.

२०२४ मध्येही पुन्हा भाजपचीच सत्ता येईल, असे भाकीत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले. दरम्यान, आमदार गोरेंच्या शेजारी बसलेले मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, अतुल भोसले यांचा हात हातात घेऊन तो उंचावत माझ्यासहित चौघे आमदार असतील, असेही स्पष्ट करत ‘मैं जो बोला ओ, बोला...’ असा डायलॉग त्यांनी मारला.

शासकीय विश्रामगृहात आमदार गोरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली. रामराजेंनी केलेल्या टीकेवर आमदार गोरे म्हणाले, ‘‘म्हसवड कॉरिडॉर एमआयडीसीबाबत सत्ता नसताना ही आम्ही रामराजेंचे शहाणपण चालून दिले नाही. आता तर आमचीच सत्ता आहे.

एमआयडीसीबाबत त्यांनी लोकांना भडकविण्याचा प्रयत्न केला. एमआयडीसीवरून राष्ट्रवादीतील दोन गट भांडत होते. एक गट कोरेगावसाठी प्रयत्न करत होता, तर दुसरा गट म्हसवडला होण्यासाठी प्रयत्न करत होता; पण आता कॉरिडॉर एमआयडीसी म्हसवडला होणार हे निश्चित असून, केंद्राच्या टीमने पाहणी केलेली आहे.

त्यामुळे निर्णय अंतिम आहे.’’ रामराजेंच्या टीकेवर ते म्हणाले, ‘‘संजय राऊतांनंतर आता त्यांचाच नंबर आहे.’’ शिंदे, फडणवीस सरकारमधील १९ आमदारांचे निलंबन होणार असे महाविकास आघाडीचे नेते सातत्याने सांगत आहेत. याविषयी विचारले असता आमदार गोरे म्हणाले, ‘‘ही नेतेमंडळी कुठल्यातरी आशेवर जगणारी माणसे आहेत;

पण शिंदे, फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल. आगामी २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा भाजपच सत्तेत येईल.’’ त्यानंतर शेजारी बसलेले मनोज घोरपडे, धैर्यशील कदम यांचा हात हातात घेऊन तो उंचावत माझ्यासहित चौघे आमदार असतील, असेही स्पष्ट करत मैं जो बोला ओ, बोला... असा डायलॉग त्यांनी मारला. त्यांच्या शेजारी अतुल भोसलेही उपस्थित होते. या वेळी कोण कोणत्या मतदारसंघातून आमदार होणार, असे विचारले असता त्यांनी आमदार होणार इतकेच म्हणत अधिक बोलणे टाळले.