शालेय विद्यार्थ्यांना विलंबाचा 'पाठ'

भाऊराव कणबरकर
रविवार, 20 ऑगस्ट 2017

शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळावीत, यासाठी प्रयत्न होते. पण छपाई वेळेत न झाल्याने पाठ्यपुस्तके अजूनही येतच आहेत. 90 टक्के पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. उर्वरित पुस्तके महिन्याच्या अखेरीस येतील.
-ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी, बेळगाव

पाठ्यपुस्तकांचा पुरवठा नाही - पहिल्या दिवशी पुस्तके घोषणा पाच वर्षांपासून हवेतच
बेळगाव - शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याची घोषणा गेल्या पाच वर्षांपासून हवेत विरते आहे. 1 जूनपासून शाळा सुरू झालेल्या असताना यंदा ऑगस्ट संपत आला तरी सगळी पुस्तके विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीत. एक चाचणी परीक्षा तर पुस्तकांविनाच झाली, दुसरी चाचणी येत्या गणपती सणाच्या काळात आहे. पण पुस्तकांची छपाई अजूनही पूर्ण झालेली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली.

विद्यार्थी किती आणि पुस्तके हवीत किती ही माहिती शिक्षण खात्याकडे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातच शाळांकडून पोचविली जाते. त्यानुसार बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासाठी 26 लाख 57 हजार 641 पुस्तकांची मागणी होती. पण ऑगस्ट मध्यापर्यंत 24 लाख 57 हजार पुस्तकांचाच पुरवठा झाला आहे. अद्यापही दोन लाख पुस्तके आलेलीच नाहीत.

यंदा सीबीएसईच्या धर्तीवर पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. शिक्षण खात्याने हैदराबाद, बंगळूर, चेन्नई, पुण्यासह बेळगावमध्येही पुस्तकांची छपाई करवून घेतली. मात्र छपाईसाठी लागणारा कच्चा मालही पुरेसा नसल्याने समस्या उद्‌भवल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रत्येक तालुक्‍यातील बीआरसीमधून पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होतो. मुख्याध्यापक ही पुस्तके घेऊन जाण्याची व्यवस्था करतात. पण पुस्तके एकाच वेळी न आल्याने शिक्षकांना शाळा सोडून पुस्तकांसाठी कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.

ही पुस्तके नाहीत..
इयत्ता*विषय
सातवी*गणित
चौथी*गणित
नववी*गणित
दहावी* गणित, विज्ञान द्वितीय भाग

विभाग*मागणी*पुरवठा
बेळगाव शहर*6,50,180*6,27,881
बेळगाव ग्रामीण*5,11,843*4,72,682
खानापूर तालुका*2,95,530*2,73,854
बेळगाव विभाग*26,57,641*24,57,200

Web Title: belgav news Lessons for School Students