‘उत्कृष्ट पोलिस कर्मचारी’च लाच घेताना जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

जयसिंगपूर - दोन हजारांची लाच घेताना जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार चारुदत्त आत्माराम घोरपडे (वय ५४, रा. पोलिस लाईन, शिरोळ) लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. अतिक्रमण काढण्याच्या बंदोबस्तासाठी तक्रारदाराकडून लाच घेताना तो रंगेहाथ सापडला. 

जयसिंगपूर - दोन हजारांची लाच घेताना जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार चारुदत्त आत्माराम घोरपडे (वय ५४, रा. पोलिस लाईन, शिरोळ) लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. अतिक्रमण काढण्याच्या बंदोबस्तासाठी तक्रारदाराकडून लाच घेताना तो रंगेहाथ सापडला. 

कोल्हापूर-सांगली महामार्गावरील तमदलगे गावात ही कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलिस प्रशासनाने त्याचा नुकताच ‘उत्कृष्ट पोलिस कर्मचारी’ म्हणून गौरव केला होता.

तमदलगे (ता. शिरोळ) येथे सामायिक जागेत शोषखड्डा काढल्याने जयसिंगपूर न्यायालयाने २०१३ मध्ये हा खड्डा बुजविल्याचा निकाल दिला होता. मात्र, अद्याप तो न बुजविल्याने सदरचे अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिस बंदोबस्तासाठी जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील तमदलगेचे बीट हवालदार सहायक फौजदार घोरपडे याच्याकडे हे काम चार महिन्यांपासून प्रलंबित होते. तक्रारदाराने २२ डिसेंबरला घोरपडे यांना भेटून दाव्याची प्रत दिली होती. त्यानंतर अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती.  

तक्रारदाराने २४ डिसेंबरला कोल्हापुरातील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. दरम्यान, आज जयसिंगपूर पोलिस ठाण्यात शासकीय पंच साक्षीदारांच्या समक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केल्याचे निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे अतिक्रमण पाहण्यासाठी सायंकाळी तमदलगे येथे येणार असल्याचे घोरपडे यांनी तक्रारदाराला सांगून पैशांची मागणी केली. सांगली-कोल्हापूर महामार्गावर लाच घेतली असताना त्याला रंगेहाथ पकडले. 

पोलिस उपअधीक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलिस अधीक्षक राजकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक गिरीश गोंडे, पोलिस कॉन्स्टेबल मनोज खोत, पोलिस नाईक नवनाथ कदम, मयूर देसाई, संग्राम पाटील, सूरज अपराध यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: best Police officer arrested in Bribe case