चंदगडमधील 'या' माजी मंत्र्यांचा रविवारी भाजपमध्ये प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

चंदगड - माजी राज्यमंत्री भरमू पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कोल्हापूर येथे रविवारी (ता. 28) होणाऱ्या पक्षाच्या कार्यक्रमात ते जाहिर प्रवेश करतील. .

चंदगड - माजी राज्यमंत्री भरमू पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कोल्हापूर येथे रविवारी (ता. 28) होणाऱ्या पक्षाच्या कार्यक्रमात ते जाहिर प्रवेश करतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे, हिंदुराव शेळके यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.

चंदगड- आजरा तालुक्‍यात श्री. पाटील यांचा प्रभावी गट आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपची चंदगड मतदारसंघातील ताकद वाढणार आहे.  

चंदगड विधानसभा मतदारसंघात मुख्यतः भरमू पाटील आणि नरसिंग गुरूनाथ पाटील यांच्यातच लढत झाली आहे. 1990, 95 व 99 च्या निवडणुका या दोघांच्यातच झाल्या. 1990 मध्ये  काँग्रेसचे नरसिंग गुरुनाथ पाटील व अपक्ष उमेदवार भरमू सुबराव पाटील यांच्यात एकास एक अशी लढत झाली. त्या वेळी नरसिंगराव पाटील विजयी झाले. पण 1995 मध्ये भरमू सुबराव पाटील यांनी नरसिंग पाटील यांचा पराभव केला. त्यावेळी भाजप शिवसेनेस सरकार स्थापन करण्यासाठी अपक्षांना सोबत घ्यावे लागले होते. यातूनच भरमू पाटील यांना रोजगार हमी योजना राज्यमंत्री म्हणून काही काळ काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे विधानसभेच्या शेवटच्या 288 व्या मतदारसंघात काही दिवस का असेना लाल दिव्याची गाडी हा कौतुकाचा विषय ठरला होता. 

पण 1999 मध्ये मात्र भरमू पाटील पराभूत झाले. 2004 च्या विधानसभा निवडणूकीत त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळाले पण ते पराभूत झाले. त्यानंतर मात्र त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharamu Patil will enter in BJP on Sunday