कृतीतून रोजच व्हावा भारतमातेचा जयजयकार 

ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील 
शनिवार, 25 जानेवारी 2020

नगर ः प्रजासत्ताकदिन व स्वातंत्र्यदिन हे देशाचे सर्वांत मोठे  उत्सव. भारतमातेचे गुणगान गाताना शौर्य गाजविलेल्यांचे या निमित्ताने कौतुक होते. प्रत्येकाच्या मनात देशाविषयी प्रेम ओथंबून येते. देशाभिमान व्यक्त करण्यासाठी केवळ जयजयकार करून चालणार नाही, तर तसे वर्तन केले पाहिजे. गैरव्यवहाराला थारा न देण्यासाठी स्वतः त्यापासून दूर राहिले पाहिजे. स्वच्छ भारत होण्यासाठी हातभार, पर्यावरण रक्षणासाठी खारीचा वाटा, प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावणे, बंधुभाव राहण्यासाठी साह्य, दुर्बलांना मदत असे प्रत्येकाने स्वतःचे वर्तन स्वतःच केले पाहिजे. असे झाल्यास खऱ्या अर्थाने देशाची सेवा होईल.

नगर ः प्रजासत्ताकदिन व स्वातंत्र्यदिन हे देशाचे सर्वांत मोठे  उत्सव. भारतमातेचे गुणगान गाताना शौर्य गाजविलेल्यांचे या निमित्ताने कौतुक होते. प्रत्येकाच्या मनात देशाविषयी प्रेम ओथंबून येते. देशाभिमान व्यक्त करण्यासाठी केवळ जयजयकार करून चालणार नाही, तर तसे वर्तन केले पाहिजे. गैरव्यवहाराला थारा न देण्यासाठी स्वतः त्यापासून दूर राहिले पाहिजे. स्वच्छ भारत होण्यासाठी हातभार, पर्यावरण रक्षणासाठी खारीचा वाटा, प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावणे, बंधुभाव राहण्यासाठी साह्य, दुर्बलांना मदत असे प्रत्येकाने स्वतःचे वर्तन स्वतःच केले पाहिजे. असे झाल्यास खऱ्या अर्थाने देशाची सेवा होईल. भारत माझा देश आहे, ही प्रतिज्ञा म्हणताना मी भारताचा आदर्श नागरिक होऊन दाखवीन, अशी शपथही प्रजासत्ताकदिनी घ्यायला हवी. 

देशाचे पर्यावरणरक्षण 
पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक देशवासीयाचे कर्तव्य आहे. भारत देश हा पर्यटनस्थळांनी ओतप्रोत आहे. प्रत्येक जिल्ह्याची खास पर्यटकीय ओळख आहे. त्यामुळे प्रत्येकाने पर्यटनाला गेल्यानंतर आपल्या हातून तेथे काही कचरा फेकला जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. बहुतेक पर्यटनस्थळांवर कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या पडलेल्या असतात. ते स्वच्छ करण्याचे नियोजन होणे आवश्‍यक आहे. ते आपल्याला शक्‍य नसल्यास किमान स्वतः तरी तेथे कचराकुंडीचा वापर करावा. देशाचे पर्यावरण रक्षण करताना औद्योगिक वसाहतींनी काळजी घ्यावी. कारखान्याच्या माध्यमातून होणारे प्रदूषण घातक आहे. त्यासाठी प्रत्येक कारखान्याने प्रदूषण रोखणारी यंत्रणा बसविणे क्रमप्राप्त आहे. सरकारच्या नियमांनुसार संबंधित यंत्रणा बसवून प्रत्येकाने आपापले कर्तव्य पार पाडले पाहिजे. धार्मिक स्थळांजवळील नद्यांमध्येही प्रदूषण वाढते. ते रोखण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. प्रदूषणामुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी प्रत्येकाने प्रजासत्ताकदिनानिमित्त शपथ घेतली पाहिजे. 

"जलयुक्त भारत व्हावा' 
पाणीबचतीचे महत्त्व सर्वांनाच ठाऊक आहे. दुष्काळ आल्यानंतर त्याची जाणीव होते. प्रत्येक दहा ते बारा वर्षांनी मोठा दुष्काळ येतो, ही परंपरा आहे. त्यामुळे अशा दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने सज्ज व्हायला हवे. जागतिक तापमानवाढ व प्रदूषणामुळे दुष्काळ रोखण्याचे आपल्या हातात नसले, तरी त्याची परिणामकारकता कमी करण्याचे काम आपण लीलया करू शकतो. प्रत्येकाने पाण्याची बचत करायला हवी. भूगर्भातील पाणी पातळी वाढल्यास त्याचा फायदा सर्वांनाच होतो. त्यामुळे अतिपाणीउपसा होणार नाही, पावसाच्या रूपाने निसर्गाने दिलेल्या पाण्याची साठवणूक व्हावी. उपलब्ध पाण्याची बचत करण्याचे प्रत्येकाने मनोमन ठरविले पाहिजे. तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचे काम यापूर्वी झाले, तसे यापुढे होऊ नये. पाणीबचतीबाबत नगर जिल्ह्याने हिवरेबाजारच्या रूपाने आदर्श घालून दिलेला आहे. त्याचा कित्ता देशभर गिरविला जावा. असे झाल्यास जलयुक्त भारत झाल्याशिवाय राहणार नाही. 

देश व्हावा भ्रष्टाचारमुक्त 
भारतमातेला भ्रष्टाचाराची लागलेली कीड अजून नष्ट व्हायला तयार नाही. प्रत्येक क्षेत्रात त्याचा शिरकाव आहे. गल्ली ते दिल्लीत भ्रष्टाचार झाल्याची उदाहरणे कायम समोर येत आहेत. याला आळा घालण्यासाठी नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येकाने भ्रष्टाचारमुक्तीची शपथ प्रजासत्ताकदिनी घ्यायला हवी. इतर ठिकाणचा भ्रष्टाचार रोखता आला नाही, तर किमान आपण स्वतः अशा फंदात पडणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. प्रत्येक भारतीयाने ही भावना ठेवून व्यवहार केले, आपापली कामे केली, तर गैरव्यवहाराला थारा राहणार नाही. भारतमातेला भ्रष्टाचाराच्या मोठ्या जखमा झाल्या आहेत. त्या भरून काढण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने मलमपट्टी करायला हवी. 

स्वच्छ भारताचे स्वप्न 
पंतप्रधानांनी स्वच्छ भारत करून जगात आदर्श निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले आहे. या उपक्रमास आपण साथ दिली पाहिजे. आपण राहत असलेल्या, काम करीत असलेल्या परिसरात स्वच्छता कशी राहील, हे प्रत्येक नागरिकाने पाहिले पाहिजे. आपणास दिसत असलेला अस्वच्छ परिसर स्वच्छ करता येणे शक्‍य नसेल, तर किमान आपण स्वतः तरी कुठेही कचरा टाकणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. प्रजासत्ताकदिनानिमित्त स्वच्छतेची शपथ प्रत्येक भारतीयाने घेतल्यास स्वच्छ भारत, सुंदर भारत होण्यास वेळ लागणार नाही. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, स्वच्छ भारत अभियान अशा विविध योजना सरकार राबविते. याला राजकीय रंग न देता हा विषय देशाच्या फायद्याचा आहे, हे विसरू नये. आपल्या भारत देशाचे केवळ कौतुक करून चालणार नाही, तर हे सर्व प्रत्येकाने कृतीतून दाखवून दिले पाहिजे. 

बना आदर्श देशभक्त 
देशासाठी प्राणत्याग केलेल्यांच्या शौर्यगाथा आपण प्रजासत्ताकदिनी गातो. विविध गाण्यांच्या माध्यमातून बलिदानाचे गीत प्रत्येकाला स्फूर्तिदायक ठरते. चौकाचौकात देशभक्तिपर गीते मोठ्या आवाजात सुरू असतात. त्यामुळे दिवसभर देशभक्ती नसानसांत भिनते. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी कामी आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणी या निमित्ताने जागविल्या जातात. हे सर्व एक दिवस न राहता रोजच्या जीवनात देशभक्ती प्रत्येकाच्या रक्तात खिळली पाहिजे. आपण भारत देशात जन्माला आलो याचा अभियान प्रत्येकाला असायला हवा. मायभूमीला, भारतमातेला आपल्या स्वतःच्या आईइतकेच महत्त्व देऊन तिचे रक्षण करायला हवे. आदर्श देशभक्त बनण्याची शपथच प्रजासत्ताकदिनी घेतल्यास देशाबरोबर प्रत्येकाचे जीवनमान सुधारेल, यात शंका नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat Mata everyday shout for joy from action