esakal | सांगलीत कोण उभारतय ऑक्सिजन प्लांट? वाचा सविस्तर

बोलून बातमी शोधा

सांगलीत कोण उभारतयं ऑक्सिजन प्लांट? वाचा सविस्तर
सांगलीत कोण उभारतयं ऑक्सिजन प्लांट? वाचा सविस्तर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : महाराष्ट्रा त कोरोनाची परिस्थिती केंद्र शासनाला माहिती आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन, ऑक्सिजनचा पाहिजे तितका पुरवठा केंद्राकडून होत नाही. याबाबत केंद्राने महाराष्ट्राशी दूजाभाव न करता माणुसकी जपावी आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजनचा तातडीने पुरवठा करावा असे आवाहन कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

डॉ. कदम यांनी आज महापालिकेत कोरोना उपाय योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री डॉ. कदम म्हणाले, महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजन व रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजन व रेमडेसीवीरची मागणी केंद्राकडे केली होती. केंद्राकडे 36 हजार इंजेक्शनची मागणी केली होती. मात्र केंद्राने त्यामध्ये घट केली असून केवळ 26 हजार इंजेक्शन राज्याला दिले जात आहे. केंद्र सरकारने हा दुजाभाव करू नये. आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. केंद्राने याठिकाणी दूजाभाव न करता माणुसकी जपावी असे डॉ. कदम म्हणाले.

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. लागेल तेवढा ऑक्सिजन व रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी राज्य शासन युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. इतर राज्यातून, स्वतःचे ऑक्सिजन उत्पादन वाढवून, उद्योगासाठी लागणारा ऑक्सिजन कोरोना रुग्णासाठी वळवण्यात येत आहे, असे मंत्री डॉ. कदम यांनी सांगितले.

लसीच्या किमतीसाठी सरकारचे प्रयत्न

सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ‘कोविशिल्ड’ लसीच्या किमती जाहीर केल्या आहेत. यात राज्य सरकारला चारशे तर खासगी रूग्णालयांमध्ये सहाशे रूपयांना लस मिळणार आहे. याबाबत बोलताना मंत्री डॉ. कदम म्हणाले, किंमतीत तफावत असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सीरम इन्स्टिट्युटशी चर्चा सुरू आहे. मी सुद्धा इन्स्टिट्युटच्या अदर पुनावाला यांच्याशी बोललो आहे. यातून लवकरच सकारात्मक मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

'भारती' उभारणार ऑक्सिजन प्लांट

ऑक्सिजनचा तुटवडा सध्या भासत नाही. मात्र रूग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर ऑक्सिजनची गरज वाढू शकते. त्यासाठी भारती हॉस्पिटलच्यावतीने सांगली व पुण्यात उच्च क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट बसविण्यात येणार आहेत. यातून भारती हॉस्पिटलच्या रुग्णाबरोबर इतर रूग्णालयांनाही ऑक्सिजन पुरवठा केला जाईल. तीन आठवड्यात हे काम होईल. डॉ. अस्मिता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. असे मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.

Edited By- Archana Banage