भिलवडीत खुल्या आरक्षणाने बहुरंगी लढती 

सतीश तोडकर - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 24 जानेवारी 2017

भिलवडी - येथील झेडपी गट खुला झाल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. "मिनी मंत्रालय' निवडणूक चुरशीने होण्याचे संकेत आहेत. वरून दुरंगी वाटणारी लढत आतून बहुरंगी ठरण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, प्रस्थापित कॉंग्रेस व राष्ट्रवादीला भाजप नवा पर्याय म्हणून पाय रोवताना दिसत आहे. 

भिलवडी - येथील झेडपी गट खुला झाल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. "मिनी मंत्रालय' निवडणूक चुरशीने होण्याचे संकेत आहेत. वरून दुरंगी वाटणारी लढत आतून बहुरंगी ठरण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, प्रस्थापित कॉंग्रेस व राष्ट्रवादीला भाजप नवा पर्याय म्हणून पाय रोवताना दिसत आहे. 

भिलवडी जिल्हा परिषद गटात माळवाडी व वसगडे असे दोन गण आहेत. माळवाडी गणामध्ये माळवाडी, भिलवडी व चोपडेवाडी, तर वसगडे गणात सुखवाडी, ब्रह्मनाळ, खटाव, वसगडे, भिलवडी स्टेशन, हजारवाडी, खंडोबाचीवाडी गावांचा समावेश आहे. आजवर मोठ्या लोकसंख्येच्या गावात जिल्हा परिषदेची तर त्याहून कमी मतदान असलेल्या गावात पंचायत समितीची उमेदवारी असेच सूत्र राहिले आहे. आता आजवर संधी न मिळालेल्या गावातून कार्यकर्ते पक्ष व नेते मंडळीकडे आग्रह धरत आहेत. 

पलूस तालुका निर्मितीपासून गट व गणामध्ये कॉंग्रेस पक्षाची सत्ता आहे. मात्र गतवेळच्या वसगडे गण पोटनिवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार निवडून आला. केंद्र आणि राज्यातील सत्तांतर, नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. माजी मंत्री पतंगराव कदम यांनी मतदारसंघात मोठा विकास निधी दिला आहे. गटातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर डॉ. कदम गटाची सत्ता आहे. या विरोधात आजपावेतो राष्ट्रवादीचे आव्हान राहिले आहे. राष्ट्रवादीने क्रांती कारखान्याच्या माध्यमातून तालुक्‍यातील प्रत्येक गावात गट ठेवला आहे. मात्र केंद्रात आणि राज्यातील सत्तेनंतर भाजपने गेल्या दोन वर्षांत कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील गटांना बरोबर घेत महाआघाडीच्या नावाखाली काही ग्रामपंचायतींमध्ये सत्ता हस्तगत केली आहे. 

जिल्हा परिषदेसाठी कॉंग्रेसकडून माजी सदस्य संग्राम पाटील, माजी सरपंच विजय चोपडे, वसगडे येथील अमोल पाटील, अनिल पाटील, भाजपकडून भिलवडीचे विद्यमान सरपंच सुरेंद्र वाळवेकर, रमेश पाटील, राष्ट्रवादीचे मोहन पाटील तर ब्रह्मनाळचे विद्यमान पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा स्वाभिमानी संघटनेतर्फे स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Bhilavadi open reservation