esakal | भिलवडी: मुलगी झाली, थाटामाटात घरी आली!
sakal

बोलून बातमी शोधा

भिलवडी: मुलगी झाली, थाटामाटात घरी आली!

भिलवडी: मुलगी झाली, थाटामाटात घरी आली!

sakal_logo
By
सतीश तोडकर

भिलवडी: मुलगी झाल्यावर नाक मुरडणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी घटना भिलवडीत घडली. येथील डिसले कुटुंबीयांनी मुलीचा गृहप्रवेश घोड्यावरून, वाजंत्रीच्या गजरात मोठ्या थाटामाटात केला. येथील दिलीप आनंदराव डिसले खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. त्यांना दोन मुलगे आहेत.

हेही वाचा: गणेशोत्सवाची ठरली नियमावली! पुजेसाठी 50 जणांनाच परवानगी

मात्र मुलगी नसल्याची त्यांना खंत होती. गेल्यावर्षी त्यांचा मुलगा मंगेश यांचा विवाह खोतवाडी (ता. मिरज) येथील शुभांगी शिंदे यांच्याशी झाला. किमान नातीच्या रूपाने तरी आपल्या कुटुंबात मुलगी यावी अशी सर्वांची इच्छा होती. २२ एप्रिल रोजी शुभांगी यांना मुलगी झाली, अन् डिसले कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेना. तिचे नित्या असे नामकरण करण्यात आले. आता नातीचे स्वागत मोठ्या थाटामाटात करण्याचा बेत दिलीप डिसले यांनी केला.

त्यासाठी मोठी तयारी केली. घरात फुलांची मोठी सजावट करण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी, फुलांच्या माळा, पायघड्या घालण्यात आल्या. सकाळी फटाक्यांच्या आतषबाजीत गावच्या बाजारमैदानात तिचे जंगी स्वागत झाले. पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून नित्या व शुभांगी यांची मिरवणूक निघाली.

हेही वाचा: गृहराज्यमंत्र्यांचा आदेश; अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळल्या

'मुलीला समजू नका भार, त्या आहेत जीवनाचा आधार', असा फलक मिरवणुकीच्या दर्शनी होता. बाजारमैदानातून वाजंत्रीच्या गजरात त्यांची मिरवणूक निघाली. घरी जल्लोषात त्यांचे स्वागत झाले. फुलांच्या पायघड्या, आरास, सजावट, मंजूळ स्वरात संगीत असा काहीसा आनंदी माहोल होता. पै-पाव्हणे, गल्लीतील सर्व रहिवासी हजर होते. नित्याच्या आगमनाप्रीत्यर्थ गावात जिलेबी वाटण्यात आली. या आगळावेगळ्या स्वागताची पंचक्रोशीत चर्चा होती.

"मला बहीण नसल्याने मुलगीच व्हावी अशी कुटुंबाची इच्छा होती. नित्याच्या रूपाने पूर्ण झाली. मुलगी झाल्यावर खेद व्यक्त करणाऱ्यांसाठी यातून निश्चित संदेश मिळेल. आम्ही सर्व आनंदी आहोत."

loading image
go to top