तारळे येथे आज भीम-कुंती उत्सव ; "श्रीं'च्या विसर्जनाने होणार उत्सवाची सांगता 

सकाळ वृत्तसेवा
02.39 AM

सायंकाळी तारळी नदीत "श्रीं'च्या विसर्जनाने उत्सवाची सांगता होणार आहे. 

तारळे ः गणेशोत्सवाबरोबरच तारळेकरांना भीम-कुंती यात्रा उत्सवाचे वेध लागतात. शेकडो वर्षांपूर्वी सुरू झालेला भीम-कुंती उत्सव उद्या शनिवारी (ता. 14) आहे. त्यावेळी भीमसेन महाराज व माता कुंतीची मिरवणूक निघणार आहे. सायंकाळी तारळी नदीत "श्रीं'च्या विसर्जनाने उत्सवाची सांगता होणार आहे. 

भीमसेन क्रीडा मंडळाची यात्रा उत्सवाची लगबग सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने उत्सवासाठी तारळेकर सज्ज झाले आहेत. परंपरागत भीम-कुंती उत्सवाची सुरवात नागपंचमीला होते. नागपंचमीला कुंभार बांधव भीमसेन मंडपात विधिवत मातीचा गोळा स्थापन करतात. या गोळ्यात माती चिखलाची भर घालून गाड्यावर बैठी पाच ते सहा फूट उंचीची भीमाची सुबक मूर्ती तयार करतात. भीमाची मूर्ती कागदी वस्त्रालंकारांनी सुशोभीत करतात. सूरज बेंद्रे यांनी मेहनत घेऊन मूर्तीचे आकर्षक सुशोभीकरण केले आहे.

श्रावणातील शेवटच्या शनिवारी माता कुंतीचे वाजत गाजत आगमन उत्सव मंडपात होते. दोन्ही मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना केली जाते. प्रतिष्ठापनेपासून यात्रेच्या मुख्य दिवसापर्यंत सकाळ-संध्याकाळ आरती केली जाते. रोज विविध मंडळांचे भजन, कीर्तन सुरू आहे. त्याचबरोबर अखंड वीणा प्रहर उभा केला जातो. पौर्णिमेच्या संध्याकाळी प्रत्येक घरातून नैवेद्य आणून भीम-कुंतीस दाखविला जातो. भाविक भक्तगण नवसासाठी यावेळी मोठी गर्दी करतात. रात्री नऊच्या सुमारास जाधव भावकीचे मानाचे उदबत्तीचे झाड वाजत गाजत मिरवणुकीने उत्सव मंडपात दाखल झाल्यावर महाआरती होते. यावेळी भीमसेन क्रीडा मंडळातर्फे शोभेचे दारूकाम केले जाते. लगेचच महाप्रसादाला सुरवात होते. यावेळीचे अन्नदान प्रमोद होनराव यांच्याकडून होणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhim-Kunti festival today at Tarle