शुभ संक्रमण..."तीळ'मात्रही शंका नाही!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

कोल्हापूर - बदलती जीवनशैली आणि तंत्रज्ञानाच्या युगातही मराठी सण, परंपरेच्या आचरणातून आरोग्यदायी विचार जपला जातो आहे.

कोल्हापूर - बदलती जीवनशैली आणि तंत्रज्ञानाच्या युगातही मराठी सण, परंपरेच्या आचरणातून आरोग्यदायी विचार जपला जातो आहे.

हिवाळ्यातील कडाक्‍याच्या थंडीत धनुर्मास आणि भोगीच्या निमित्ताने शरीराला उष्मांक देणारा आहार आणि त्यानिमित्ताने ठिकठिकाणी होणाऱ्या सार्वजनिक सोहळ्यांची परंपरा आजही काही ठिकाणी टिकून आहे. यंदाच्या आंग्ल नववर्षाचा प्रारंभही राज्यभरात "शुभ संक्रमण-"तीळ'मात्रही शंका नाही', असा संदेश देत आरोग्यदायी ठरणार आहे.

धनुर्मास-भोगी म्हणजे काय?
तीन ऋतूंबाबत "उन्हाळा योगी, पावसाळा रोगी आणि हिवाळा भोगी', अशी म्हण आहे. साधारणपणे थंडीच्या दिवसांत भूक वाढते. गरम, सात्विक, पौष्टिक अन्न आणि उबदार कपड्यांवर भर दिला जातो. भरपूर भाज्या, फळे, ऊस, हरभरा, हुरडा अशी लयलूट सर्वत्र सुरू असते. तिळगूळ, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी, लोणी, तूप आणि मुगाच्या डाळीची खिचडी यातून शरीराला उष्मांक मिळतो. सर्वांगीण आरोग्यासाठी जशी भोगी महत्त्वाची ठरते, तशीच ती एक तीळ सात जणांत वाटून खायचा संस्कारही देते. भोगी हा धनुर्मासाच्या शेवटचा दिवस आणि धनुर्मास म्हणजे सूर्याचा धनू राशीतील वास्तव्याचा काळ. त्यामुळे भोगीच्या दुसऱ्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो.

तिळगूळच कशासाठी?
हिवाळ्यात भूक जास्त लागते. त्यामुळे जठराग्नीला अनुरूप असा आहार घेतला नाही, तर तो शरीरातील धातूंचे पचन करून दुर्बलता आणतो. त्यामुळे या काळात धनुर्मास पाळण्याची परंपरा सुरू झाली. गरम गरम खिचडी, त्यावर तूप, तीळ घालून केलेली बाजरीची भाकरी, त्यावर लोणी, भरीत, वांग्याची भाजी, तिळगूळ, तीळवडी अशा आहारावर या काळात जाणीवपूर्वक भर द्यावा लागतो. तिळगुळामध्ये तीळ आणि गूळ हे दोन प्रमुख घटक असतात. तिळाचे आयुर्वेदात फार मोठे महत्त्व आहे. तीळ हे मधूर, उष्ण गुणधर्माचे आहेत. ते बलदायक, पौष्टिक आहेत. काळे तीळ गुणधर्माने श्रेष्ठ आहेत. सर्व वातरोगांवर तिळाचे तेल सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे हिवाळ्यात तिळतेलाने अभ्यंगस्नान करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे त्वचा मऊ, कांतिमान होते. गूळ मधूर, उष्ण आणि पौष्टिक असतो. त्यामुळेच तिळगूळ पौष्टिक, बलदायक, शरीरातील स्नेह वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतो.

आपला प्रत्येक सण साजरा करण्यामागे आरोग्यदायी दृष्टिकोन आहे. हिवाळ्यात शरीराला उष्मांक देणारा आहार मिळावा, याची तरतूद धनुर्मास आणि पुढे मकरसंक्रांतीच्या निमित्ताने केलेली दिसते.
- डॉ. सुनील पाटील, कोल्हापूर

Web Title: bhogi celebration