भुदरगडला भाजप प्रवेशाचा फुसका बार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

गारगोटी - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्वत:च्या भुदरगड तालुक्‍यात नेते, कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीचा सुरुंग लावला होता. मात्र तो फुसका बार निघाला. शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रवीणसिंह सावंत व मोजक्‍याच कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर त्यांना समाधान मानावे लागले.

गारगोटी - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्वत:च्या भुदरगड तालुक्‍यात नेते, कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीचा सुरुंग लावला होता. मात्र तो फुसका बार निघाला. शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रवीणसिंह सावंत व मोजक्‍याच कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर त्यांना समाधान मानावे लागले.

खानापूर येथील हिरा पॅलेसमध्ये भाजपतर्फे राधानगरी-भुदरगड तालुक्‍यांतील भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेते, कार्यकर्ते यांच्यासाठी बैठक आयोजित केली. या वेळी प्रवीणसिंह सावंत, ज्येष्ठ नेते आर. डी. पाटील, माजी सरपंच विद्या सावंत, उपसरपंच शशिकांत पाटील, सदस्या तृप्ती पुजारी (खानापूर), ऍड. के. एस. पाटील, संतोष देशपांडे (दिंडेवाडी), संजय तानवडे (नांगरगाव), संजय मोरे (महालवाडी), गोपाळ राजिगरे (दारवाड), दिलीप कदम, डॉ. महादेव साठे, प्रकाश खोत, दत्तात्रय साळोखे, भरत साळोखे, अरविंद पाटील (पडखंबे), शंकर राऊळ, शांताराम मांडे (मडिलगे खुर्द) यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ""विरोधक आमच्यावर आजही जातीयवादी पक्ष म्हणून आरोप करीत आहेत. मात्र देशासह राज्यात आजही भाजपची लाट कायम आहे. पंचवीस वर्षे भाजपची सत्ता राहील, असे चित्र आहे. यामुळे पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भाजपच्या चांगल्या योजनांमुळे सामान्य माणूस आमच्यासोबत आहे.''

प्रवीणसिंह सावंत म्हणाले, ""पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी कायमचा स्नेह असल्याने मी पक्षप्रवेश केला आहे. मी अखेरच्या श्‍वासापर्यंत भाजपमध्ये राहीन व पक्षवाढीसाठी प्रयत्न करेन.''

नाथाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ नेते बाबा देसाई, देवराज बारदेसकर, ऍड. के. एस. पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी अलकेश कांदळकर, धनाजी मोरूसकर, प्रा. हिंदूराव पाटील, संतोष पाटील, के. बी. देसाई, राहुल चौगले, दीपक शिरगावकर, उमेश देसाई, सुशांत मगदूम आदी उपस्थित होते. योगेश परुळेकर यांनी आभार मानले.

* सर्वांना संधी
पालकमंत्री पाटील म्हणाले, ""नवीन सून आली म्हणून सासूला कोणी बाहेर काढणार नाही. या मुळे जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरायचे कारण नाही. आमची ही संस्कृती नाही. कोणत्याही कार्यकर्त्यांनी घाबरू नये. सर्वांना कुवतीनुसार भविष्यात संधी दिली जाईल. पक्षात आल्याचा कोणालाही पश्‍चात्ताप होणार नाही.

* मी सार्वजनिक कामात कधीही राजकारण करणार नाही. मात्र व्यक्तिगत कामे करताना डावा-उजवा याचा विचार केला जाईल. योजना आम्ही मंजूर करायच्या आणि नारळ दुसऱ्यांनी फोडायचे, असे होऊ देणार नाही, असेही मंत्री पाटील म्हणाले.

Web Title: bhudargad bjp politics