भाजपच्या मुलाखतीस छप्पर फाडके प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

सांगली : महापालिका निवडणुकीत विजयाचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार मुलाखतीस छप्पर फाडके प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशाचा गजर, हलगीचा कडकडाटात आणि जोरदार घोषणाबाजी करत इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारीची मागणी केली. भाजप शिस्तबद्ध पक्ष असला तरी इच्छुकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी स्टाईलने घोषणाबाजी करत उमेदवारी मागितल्याचे चित्र दिसले. 

सांगली-मिरज रस्त्यावरील कच्छी जैन भवनमध्ये आज सकाळी भाजपच्यावतीने दहा प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखतीस प्रारंभ झाला. खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, निरीक्षक रवि अनासपुरे, पंढरपूर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अतुल भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, दीपक शिंदे, प्रकाश बिरजे, नीता केळकर, मकरंद देशपांडे, दिलीप सूर्यवंशी, शरद नलवडे आदी उपस्थित होते. 
प्रभागनिहाय मुलाखतीस प्रारंभ झाला. इच्छुकांना माईकवर बोलण्याची संधी दिली. इच्छुकांनी प्रभागात केलेल्या विविध कामांचा हवाला देत उमेदवारांची मागणी केली.

तिकिट द्या निवडून येण्याची गॅरंटी देतो. भाजपमध्ये आजवर प्रामाणिकपणे काम केल्याचे सांगून उमेदवारी देण्याची विनंती केली. उमेदवारांच्या भाषणानंतर समर्थक त्यांच्या नावाच्या जोरदार घोषणा सभागृहात देत होते. त्यामुळे मुलाखतीमध्ये अनेकदा व्यत्यय येत होता. तेव्हा घोषणाबाजी बंद करण्याची विनंती मुलाखतकर्त्यांना करावी लागली. पक्षाचे मफलर, टोप्या, झेंडे घेऊन इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन केले. 

दुचाकीच्या पुंगळ्या काढूनही जोरदार फायरिंग करत कार्यकर्ते फेऱ्या मारताना दिसले. एका उमेदवाराने बैलगाडीतून कार्यकर्ते आणून उमेदवारी मागितली. शिस्तबद्ध पक्ष अशी ओळख असलेल्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागताना अनेकांनी काँग्रेस, राष्ट्रवादी स्टाईलने शक्तीप्रदर्शन केल्याचे चित्र दिसले. सायंकाळपर्यंत दहा प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या. 

Web Title: big response to BJP's interview