केळवलीकरांच्या माथ्यावर महाकाय दगड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

कास - परळी खोऱ्यात डोंगराच्या कुशीत मध्यभागी वसलेले केळवली गाव. या गावावर केव्हाही गावालगतच्या डोंगराच्या माथ्यावर असलेले महाकाय दगड कोसळण्याची स्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थ भयभीत अवस्थेत जीवन जगत आहेत. 

कास - परळी खोऱ्यात डोंगराच्या कुशीत मध्यभागी वसलेले केळवली गाव. या गावावर केव्हाही गावालगतच्या डोंगराच्या माथ्यावर असलेले महाकाय दगड कोसळण्याची स्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थ भयभीत अवस्थेत जीवन जगत आहेत. 

परळी खोऱ्यात शेवटच्या टोकावर डोंगराच्या कुशीत वसलेल्या केळवलीलगतच वरच्या बाजूला मोठा डोंगर आहे. या डोंगरावर अनेक ठिकाणी मोठे दगड आहेत. या परिसरात पावसाळ्यात चार महिने अतिवृष्टी होते. त्यामुळे काही ठिकाणी दगड, झाडे व दरडी कोसळण्याचे सत्र सुरू असते. पावसामुळे डोंगराच्या जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होऊन महाकाय दगड उघडे पडू लागलेत. त्यामुळे या महाकाय दगडांचा थांबण्याचा आधारच संपू लागला आहे. जमीन खचल्यास किंवा भूस्खलन झाल्यास हे दगड गावावर केव्हाही कोसळून जीवितहानी होण्याचा धोका आहे. त्यामुळे केळवळीकर जनता जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहे. 

या परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याने डोंगराची धूप होऊन पाण्याच्या प्रवाहाबरोबर लहान-मोठे दगड वाहून येत आहेत. रात्री-अपरात्री एखादा मोठा आवाज झाल्यास ग्रामस्थ घाबरून घराबाहेर धाव घेत आहेत. 

हे महाकाय दगड हटवण्यासाठी ग्रामस्थांनी वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते. त्यावेळी मंडलधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून पंचनामाही केला असून दगडी धोकादायक असल्याचा अभिप्राय शासनाला पाठविला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही शासनाकडे दगड हटवण्याची लेखी मागणी केली आहे. ग्रामस्थही वारंवार पाठपुरावा करत आहेत. मात्र, अद्याप प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेतली नाही. दगड कोसळून दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार की काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत. 

जोरदार पावसामुळे डोंगरातील दगडांजवळील माती वाहून जात असल्याने महाकाय दगडांचा आधारचा संपला आहे. त्यामुळे हे मोठे दगड केव्हाही लोकवस्तीवर कोसळू शकतात. हे दगड हटवणे ग्रामस्थांना शक्‍य नाही. या दगडांनी आमची झोप उडवली आहे. 
- हरिभाऊ केरेकर, ग्रामस्थ, केळवली 

Web Title: Big stone in kelvali village